8 दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद!

0

पुणे । सिंहगडावर जाणार्‍या घाटात रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली होती. सुदैवाने सुरक्षारक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. रविवारच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी सिंहगडावर जाणार्‍या रस्त्यावर अचानक मोठी दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. मात्र सिंहगडावर जाणार्‍या रस्त्यालगत अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कोसळलेली धोकादायक दरड हटवण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. तर उंचावरील दगड काढण्याचे काम उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे.

प्रशासकीय यंत्रणा कुचकामी
कालच्या घटनेनंतरही यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी बराच कालावधी लागला. सुट्टीसाठी पर्यटनाला जाणार्‍या पर्यटकांनीही अतिउत्साह टाळून या घटनांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. जीवितहानी टळली असली तरी प्रशासन यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे. पर्यटनस्थळी गर्दी करणे हे पर्यटकांसाठीही धोकादायक ठरू शकते त्याचा तेथील यंत्रणांवर नाहक ताण पडत असतो. त्यामुळे प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही आपत्कालीन परिस्थीत सजग राहण्याचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तेच यातून स्पष्ट झाले.

धोकादायक दरडी काढणार
घटनेनंतर दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. तोपर्यंत पर्यटकांना गडावरच थांबण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता. दरम्यान रात्री उशिरा दगडांचा ढिगारा बाजूला केल्यानंतर सर्व पर्यटक सुरक्षित खाली उतरले. मात्र सोमवारी (दि. 31) धोकादायक दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले असून पुढील आठ दिवस सिंहगड पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

तब्बल दोन तासांनी पोलिसांना मिळाली माहिती
घाट रस्त्यावर वनविभागाने सुरक्षा रक्षक नेमले आहेत तसेच वन विभागाकडून शुल्कही घेतले जाते. मात्र तरीही अशा घटना घडल्यास त्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. रविवारीही नागरिक आणि वनरक्षकांनी हाताने पडलेले दगडी उचलत दुचाकींसाठी रस्ता तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र मोठे दगड हलवण्यासाठी जेसीबीसारख्या यंत्रणांची गरज होती. दरड कोसळल्यानंतर तब्बल दोन तासांनी याची माहिती हवेली पोलिसांना देण्यात आली. यामुळे सायंकाळी सहाच्या सुमारास हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोल्डे हे पथकासह सिंहगड किल्ल्याकडे निघाले होते.

सुरक्षेसाठी 1 कोटी 65 लाख रुपये मंजूर
सिंहगडाच्या सुरक्षेसाठी 1 कोटी 65 लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले असले, तरी गेली दोन वर्षे हे पैसे नुसतेच पडून आहेत. या पैशांचा उपयोग धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवण्यासाठी होणे गरजेचे आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग त्याबाबत करत असलेल्या दिरंगाईमुळे पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.