भुसावळ। नगरपालिकेत विविध विभागातील जवळपास 40 टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे विकासकामांमध्ये अडचणी येऊन कामांच्या मंजुरी देण्यासंदर्भात अडथळे निर्माण होत असल्याचे पाहून पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधार्यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करुन पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरु केले, त्यामुळेच 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता पालिकेला कायमस्वरुपी नगर रचनाकार प्राप्त झाले असून यासंदर्भात पुणे येथील नगररचना विभागातर्फे तकडाफडकी निर्णय घेण्यात येऊन 20 रोजी नियुक्तीपत्र काढून सहाय्यक नगर रचनाकार स्मिता कलकुटकी यांना लागलीच रुजू होण्याचे आदेश दिल्याने कलकुटकी यांनी शुक्रवार 21 रोजी पालिकेत येऊन आपला पदभार स्विकारला. यामुळे आता बांधकामाशी निगडीत रखडलेल्या कामांना गती मिळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहे.
विविध विभागातील 40 टक्के पदे अद्यापही रिक्त
पालिकेत मागील काळातील वातावरण लक्षात घेता अधिकारी व कर्मचार्यांनी येथून आपली बदली करुन घेतली होती. नविन अधिकारी याठिकाणी येण्यास तयार नव्हते. त्यामुळे पालिकेतील विविध विभागातील जवळपास 40 टक्के पदे अद्यापही रिक्त आहेत. याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होऊन शहरातील विकास कामांना ब्रेक लागला आहे. पालिकेत निवडणूकीनंतर सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधार्यांसमोर मोठे आव्हान होते ते नविन अधिकारी व कर्मचार्यांंंची नियुक्ती करण्याचे, याखेरीज कामांचे प्रस्ताव मंजूर करणे अतिशय जिकरीचे असल्यामुळे पालिकेत कायमस्वरुपी अधिकार्यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी सत्ताधार्यांनी जिल्हाधिकार्यांसह वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरु केला आहे.
उपअभियंत्यांचे आदेश
त्यामुळेच 2009 पासून म्हणजेच 8 वर्षांपासून रिक्त असलेल्या नगररचनाकार पदावर पुणे येथील नगररचना विभागातील सहाय्यक नगर रचनाकार स्मिता कलकुटकी यांची पालिकेच्या नगररचना अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात पुणे येथील नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग अंमलबजावणी कक्षाचे उपअभियंता यांनी कलकुटकी यांना नियुक्तीपत्र दिले असून त्यांना सहायक नगर रचनाकार पदावरुन कार्यमुक्त करीत भुसावळ पालिकेत नगररचनाकार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना यासंदर्भात शुक्रवार 21 रोजी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार कलकुटकी यांनी आज पालिकेत आपला पदभार स्विकारला.
पालिकेत अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे आस्थापना विभागात शिपाई दर्जाच्या कर्मचार्यांना काम करावे लागते. गेल्या आठ वर्षांपासून नगररचनाकार पद रिक्त होते. मात्र शासनदरबारी पाठपुरावा करुन या पदावर कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता लेखापाल, शहर अभियंता, पाणी पुरवठा, लिपीक अशा विविध पदांसाठी पाठपुरावा सुरु ठेवणार आहे. यामुळे विकास कामांना नक्कीच गती मिळणार.
रमण भोळे, नगराध्यक्ष
बांधकाम परवानग्या घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना जळगाव येथे नगर रचना विभागात चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असे. यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करुन पालिकेस कायमस्वरुपी नगर रचनाकार मिळाला आहे. यामुळे आता नागरिकांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.
युवराज लोणारी, उपनगराध्यक्ष