पुणे : पुण्यातील टेम्पल रोझ रियल इस्टेट प्रा. लि.च्या संचालकांनी राज्यातील आठ हजार नागरिकांची फसवणूक केली असून, तब्बल तीनशे कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा आकडा वाढण्याची भीतीही पोलिसांनी वर्तविली. भूखंड खरेदीत गुंतवणूक करा, चार वर्षांनंतर भूखंड नको असेल तर दुप्पट रक्कम देण्याच्या अमिषाने ही फसवणूक करण्यात आली. पुरंदर विमानतळानजीकचे भूखंडासह पुण्यातील महत्वाच्या लोकेशनमध्ये भूखंड देण्यापोटी शेकडोंना गंडविण्यात आले असल्याचे स्पष्ट होत आहे. ज्यांची फसवणूक झाली त्यात डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक तसेच सरकारी नोकरदारही आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात आतापर्यंत 250 तक्रारदार समोर आले आहेत. याप्रकरणी देवीदास गोविंदराम सजनानी (वय 67, रा. ब्रांदा मुंबई) यास अटक झाली असून, दीपा देवीदास सजनानी, वनिता देवीदास सजनानी, थोरात, केशव नारायण हे चौघे फरार आहेत. याबाबत नितीन शुक्ला (वय 34, रा. एनसीएल कॉलनी, पाषाण) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बनावट खाती, बनावट कंपन्या!
गुन्ह्याचे स्वरूप व्यापक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पन्नासपेक्षा जास्त खाती बनावट असल्याचे आढळून आले आहे. देवीदास व त्याच्या साथीदारांनी 2007 मध्ये गोल्डन रोझ रियल इस्टेट प्रा. लि. आणि गोल्डन रोझ लाईफ स्टॉक प्रा. लि. नावाने दोन कंपन्या स्थापन केल्या. लाईफ स्टॉक कंपनीच्या नावाने पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे 2011-12 मध्ये 440 एकर जमीन विकत घेऊन येथे ‘हप्त्याने पैसे भरा आणि प्लॉट विकत घ्या. प्लॉट नको असल्यासे चार वर्षात दामदुप्पट पैसे घ्या’ अशी योजना जाहीर केली. त्यास अनेकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, अनेकांना मुदत पूर्ण झाली तरी, पैसे मिळाले नाहीत आणि प्लॉटही नावावर झाला नाही. प्लॉटची चौकशी करण्यासाठी गेले, त्यावेळी ही जमीन गोल्डन रोझ रियल इस्टेटची नसून ती गोल्ड रोझ लाईफ स्टॉक प्रा. लि.च्या नावाची आहे. तसेच, जमीन एनए नसल्याचे समजले. त्यामुळे तिवारी यांनी मार्च महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून देवीदास सजनानीला अटक करण्यात आली.
राज्यभर घोटाळ्याची व्याप्ती, 800 एजंट
या भूखंड घोटाळ्यांबाबत प्रसारमाध्यमांनी प्रकाशझोत टाकल्यानंतर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे येऊन चौकशी करण्यास सुरुवात केली. टेम्पल रोझ रियल इस्टेट प्रा. लि.च्या संचालकांनी अशा प्रकारे महाराष्ट्रातील आठ हजार नागरिकांची फसवणूक केल्याचा अंदाज आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात आतापर्यंत अडीचशे तक्रारदार समोर आले आहेत. त्यांची आठ कोटींची फसवणूक झाली आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात एजंट नेमून सुमारे चार हजार गुंतवणुकदारांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. यामध्ये उच्चशिक्षितांचाही समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून टेम्पल रोझची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आल्यानंतर महाराष्ट्रात जवळपास आठशे एजंट असल्याचे तपासात समोर आले. पोलिस प्रत्येक एजंटला बोलावून चौकशी करत आहेत. दरम्यान, कंपनीने एजंट म्हणून नोंद केलेल्या काही व्यक्तींना आपण एजंट असल्याचे पोलिसांकडूनच समजल्याने गोंधळ उडाला आहे. एखाद्याने प्लॉट घेतल्यानंतर त्याच्या ओळखीवर आणखी दोघांनी प्लॉटची बुकींग किंवा पैसे गुंतवल्यास त्या व्यक्तीलाही एजंट म्हणून कंपनीने नेमले आहे. त्यांना रोख स्वरुपात पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत पैसे देण्यात आले आहेत. 50 लाख ते 1 कोटी कमिशन मिळालेल्या एजंटला पोलिसांकडून बोलविण्यात येत आहे. त्यांच्याकडून पैसे जमा केले जात आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी दिली.
कंपनीची 76 बँक खाती सील
टेम्पल रोझ रियल इस्टेट प्रा. लि.ची पोलिसांनी आतापर्यंत 76 बँक खाते सील केली आहेत. त्यामध्ये आठ कोटींची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीची आणखी काही बँक खाती आहेत का, याबाबत तपास सूरु आहे. मुंबई, पुणे तसेच महाराष्ट्रातील मुख्य शहरांमधील नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. टेम्पल रोझकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आठ हजार नागरिकांची फसवणूक झाल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला. त्यामधील तीन गुंतवणूकदार दररोज पोलिसांना मदत करत आहेत. येणार्या नागरिकांनी फॉर्म कसा भरायचा, पुढे काय करायचे, यासह पुढील दिशा व्हॉट्सअपग्रुपच्या माध्यमातून केली जात आहे. दर शनिवारी गुंतवणूकदारांची बैठक पोलिस घेत आहेत. पोलिस आणि फसवणूक झालेल्या व्यक्ती एकत्रित काम करत असल्याचा हा पहिलाच गुन्हा आहे.
अकराजण अटकपूर्वसाठी न्यायालयात
टेम्पल रोझचा देवीदास सजनानी यास अटक केली आहे. मात्र, पत्नी दीपा देविदास सजनानी, मुलगी वनिता देवीदास सजनानी, थोरात, केशव नारायण यांच्यासह सल्लागार, चार्टर अकाऊंटंट आणि इतर असे अकराजणांनी अटकपूर्वसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांना जामीन मिळू नये, यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. टेम्पल रोझमध्ये महाराष्ट्रातील आठ हजार नागरिकांची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये पुणे व मुंबई येथील नागरिकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हैदराबाद येथील व्यक्तीही पोलिसांकडे फसवणूक झाल्याबाबत तक्रार देऊन गेली आहे. दररोज पोलिसांकडे 20 ते 25 तक्रार येत आहेत. आतापर्यंत 285 तक्रारदार पोलिसांकडे आले आहेत.
पैसे जमा करण्याचे एजंटना आवाहन
टेम्पल रोझ कंपनीसाठी एजंट म्हणून काम करणार्यांनी कंपनीकडून घेतलेले कमिशन कोर्टात जमा करण्याचे आवाहन, पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी केले आहे. त्यानुसार, दोन एजंटनी काही रक्कम जमा केली असून, उर्वरित रक्कम काहीदिवसांमध्ये देण्याचे कबूल केले आहे.