मुरबाड । मुरबाड तालुक्यात मार्च महिन्यात भडकलेली उष्णता त्यातच बुधवारी दुपारी 2 वाजल्यापासून सरळगाव विभागाचा ब्रेकर तुटल्याने तब्बल 11 तास 80 गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने या गावातील नागरिकांना उष्माघाताचा सामना करावा लागला. नागरिकांनी सरळगाव विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, सर्व अधिकार्यांचे मोबाइल संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण कळू शकत नव्हते तसेच सरळगाव विभागाचे लाईन मन खरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मुरबाड सुबस्टेशन मध्ये असणारा सरळगाव विभागाचा ब्रेकर पोल तुटल्याने सदरचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. तरी हे काम आमच्या लाईन मन च्या अखत्यारीत येत नसून ते मुरबाड पारेषण केंद्राच्या अखत्यारीत येते. त्यामुळे सदरचा विद्युत पुरवठा पहाटेपर्यंत चालू होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता.
त्यानंतर रात्री युद्ध पातळीवर काम करून पहाटे 1 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला. यापूर्वीही बर्याच वेळा अशा प्रकारे वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, यावर पर्यायी व्यवस्था उपलब्ध होणेसाठी कोणतीही उपाययोजना केली गेलेली नाही. त्यामुळे महावितरणच्या या गलथान कारभारामुळे अचानक उद्भवलेल्या समस्या सुटण्यासाठी खूप वेळ लागतो आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तरी भविष्यात अशी समस्या उद्भवल्यास वीज पुरवठा चालू राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.