पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने यंदापासून इयत्ता बारावीत 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणार्या विद्यार्थ्यांस प्रत्येकी 15 हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तर, दहावीमध्ये 80 ते 90 टक्के गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांस 10 हजार रुपये तसेच 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांस 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वसाधारण सभेत या विषयाला मंजुरी देण्यात आली. महापालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. विषयपत्रिकेवर पाच विषय होते. सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून अर्थसहाय्य करण्यात येते. त्यानुसार, महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना बक्षिसाची 10 ते 15 हजार रुपयांची रक्कम देण्यात येते. यंदापासून यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी दहावीच्या विद्यार्थ्यांना 85 ते 90 टक्के गुण प्राप्त केल्यास 10 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येत होते. आता 80 ते 90 टक्के गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांला 15 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. बारावीत 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणार्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहेत. यापूर्वी 85 टक्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये देण्यात येत होते.