शरद पवार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला : इंदापुरातील कार्यकर्त्यांशी चर्चा
इंदापूर । 80 लाखांचा घोडा खरेदी करण्यापेक्षा चार एकर जमीन घेतलेली बरी, असा मौलिक सल्ला शरद पवार यांनी इंदापुरातील कार्यकर्त्यांना दिला. माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार हे नांदेडचा दौरा आटपून शनिवारी पुण्याला जात होते. त्यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात ते थांबले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आमदार अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण यावेळी त्यांच्याबरोबर होते. फक्त पाच मिनीट त्यांनी चर्चा केली. या चर्चेत त्यांनी कार्यकर्त्यांना अनेक मौलिख सल्ले दिले.
इंदापूरला गेवराईचे माजी आमदार शिवाजीराव पंडित घोडे खरेदीसाठी सतत येत होते. त्याविषयी बोलताना पवार म्हणाले, 80 लाखांचा घोडा घेण्यापेक्षा 4 एकर जमीन घेतलेली बरी. या वाक्यावर कार्यकर्त्यांमध्ये हश्श्या पिकला. पवार यांनी तालुक्यातील ऊस व ऊसाची सध्याची परिस्थिती याविषयी माहिती घेतली. यावेळी एका पत्रकाराने पवार यांना तीन राज्याच्या विधानसभेच्या लागलेल्या निकालाबाबत विचारले असता त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले. इंदापूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष महारुद्र पाटील, कालिदास देवकर यांनी पवार यांचा सत्कार केला. यावेळी किसनराव जावळे, दत्तात्रेय शेंडे, बाळासाहेब करगळ, देवीदास भोंग, पांडुरंग मारकड, माऊली वाघमोडे, जयवंत बानकर, आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.