श्रीनगर : सीमा सुरक्षा दलाला जम्मू काश्मीरमधील सांबातील रामगड सेक्टरमध्ये एक भुयारीमार्ग आढळून आला आहे. आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या या भुयाराचे एक टोक पाकिस्तनच्या हद्दीत तर दुसरे भारताच्या हद्दीत आहे. घुसखोरांना भारतात पाठविण्यासाठी सीमेपलीकडून हे भुयार तयार करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. सीमा सुरक्षा दलाच्या पथकाकडून याचा तपास करण्यात येणार आहे.
पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवरून घुसखोरीच प्रयत्न सुरू आहेत. 2 फेब्रुवारीला पाकने नव्या वर्षात प्रथमच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. 3 फेब्रुवारीला पुलवामातील लष्कर ए तोयबाच्या एका स्थानिक दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. या दहशतवाद्याचे नाव मंजूर अहमद असल्याची माहिती समोर आली. मंजूर अहमदकडून एक पिस्तुल, मॅग्जीन आणि दोन हातबॉम्ब हस्तगत करण्यात आले. 12 फेब्रुवारीला कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये भारतीय जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. तर भारताचे दोन जवान शहीद झाले होते. अशा प्रकारे कारवाया करून याच स्थितीचा फायदा घेत पाकडून घुसखोरी करण्यात येत आहे.
सीमा सुरक्षा दलाची अँटी टनेल अँड डिटेक्टिंग टीम सीमा भागात तपासणी करत असताना त्यांना सांबामधील रामगड सेक्टरमध्ये सीमा परिसरात काही संशयास्पद स्थिती आढळून आली. जवानांनी अधिक शोध घेतला असता. येथे एक भुयारी मार्ग अगदी सीमारेषेला लागून खोदला असल्याचे दिसून आले. या भुयारी मार्गाची लांबी सुमारे 20 फुट असल्याचे सांगण्यात आले. आंतरराष्ट्रीय सीमेवरील तार फेसिंगखालून हे भूयार खोदले आहे. दरम्यान, बीएसएफचे डीआयजी धर्मेंद्र पारिक यांनी भूयार सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर आणि त्याआधी मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर भूयार सापडले होते. बीएसएफची स्पेशल टीम त्याचा अधिक शोध घेत आहे.