बंगळुरु : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत गुन्हे दाखल असलेल्या उमेदावारांमध्ये भाजपचा पहिला क्रमांक लागतो. भाजपच्या २२४ उमेदावारांमधील ८३ उमेदावारांवर गुन्हे दाखल आहेत. म्हणजे ही संख्या भाजपच्या एकूण उमेदवारांपैकी ३७ टक्के आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिपोर्टने (एडीआर) एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून एडीआरने कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या पार्श्वभूमी दिली आहे. उमेदवारांवरील गुन्हे, संपत्ती, शिक्षण इत्यादी गोष्टींची आकडेवारी या अहवालात देण्यात आली आहे.
कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात एकूण २ हजार ५६० उमेदवार उतरले आहेत. यापैकी ३९१ उमेदवारांवर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल आहे. म्हणजेच, कर्नाटकमधील निवडणुकीत नशीब आजमावू पाहणाऱ्या उमेदवारांपैकी १५ टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत, अशी एडीआरची आकडेवारी सांगते.