भुसावळ : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात 22 मार्चच्या मध्य रात्रीपासून रेल्वे प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्यात आल्याने राज्याच्या काना-कोपर्यात परप्रांतीयांसह पर्यटनासाठी तसेच अन्य कामांसाठी निघालेले नागरीक अडकून पडले होते मात्र या प्रवाशांना आपल्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने मोठा दिलासा देवून काही गाड्या सुरू केल्या आहेत. शनिवारी रात्री नाशिक रोड स्थानकावरून भोपाळसाठी 341 प्रवासी घेवून गाडी रवाना झाली तर भुसावळात 12.43 वाजेच्या सुमारास ही गाडी आल्यानंतर 12.53 वाजता पाणी भरल्यानंतर ही गाडी पुढील प्रवासास रवाना झाली तर शनिवारी सकाळी पुन्हा 839 प्रवाशांना नाशिक रोड-लखनऊ श्रमिक एक्स्प्रेस धावली. भुसावळात ही गाडी आल्यानंतर प्रवाशांना जेवण व पाणी देण्यात आले.
नोंदणीकृत प्रवाशांनाच गाडीत प्रवेश
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी या सर्व मजूर आणि कामगारांना विशेष बसद्वारे आणण्यात आल्यानंतर फिजिकल डिस्टन्ससह सर्व नियमांचे पालन करून या सर्वांना रेल्वेच्या डब्यात बसवण्यात आले. तत्पूर्वी संपूर्ण रेल्वे निर्जंतूक करण्यात आली. उत्तर भारतीयांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ त्याचबरोबर जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. गेल्या 23 मार्च रोजी देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये अनेक उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यातील स्थलांतरीत मजूर आणि कामगार अडकल्याने जिल्हा प्रशासन आणि नाशिक महापालिकेने त्यांची निवारा गृहात सोय केली होती. नाशिकमध्ये नोंदणीकृत झालेल्या 839 प्रवाशांना गाडी क्रमांक 02121 नाशिक रोड-लखनऊ विशेष श्रमिक गाडीने लखनऊकडे रवाना करण्यात आले. या गाडीला एकूण 17 डबे जोडण्यात आले असून त्यात 12 स्लीपर तर चार जनरल व एक गार्ड डबा आहे. नाशिक ते थेट लखनऊच्या प्रवाशांनाच गाडीमध्ये प्रवेश देण्यात आला तर नाशिकशिवाय गाडीला भुसावळ, खंडवा, इटारसी, बिना, झांशी, कानपूर याठिकाणी फक्त तांत्रिक थांबा देण्यात आला असलातरी या स्थानकावरून कुणाही प्रवाशांना प्रवेश तसेच उतरण्याची परवानगी राज्य शासनाकडून देण्यात आलेली नाही.
एका कोचमध्ये केवळ 52 प्रवाशांना प्रवेश
कोरोना संसर्गाची लागण होऊ नये याकरिता गाडीच्या एका 72 प्रवाशी क्षमता कोचमध्ये 52 प्रवाशांना बसविण्यात आलेतर गाडीला भुसावळातही पुन्हा सॅनिटाईज करण्यात आले. सोशल फिजिकल डिस्टनस पाळण्यात आला शिवाय प्रत्येक प्रवाशाला मास्क लावण्यात आले होते. शनिवारी दुपारी 1.35 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर ती 1.55 वाजता रवाना झाली. याप्रसंगी स्टेशन संचालक जी.आय.अय्यर यांच्या उपस्थितीत प्रवाशांना जेवण व पाणी बॉटल्स देण्यात आल्या. यावेळी मुख्य वाणिज्य निरीक्षक सुदर्शन देशपांडे, मुख्य तिकीट निरीक्षक व्ही.के.सचान, स्टेशन रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक दिनेश नायर, मुख्य पार्सल परीवेक्षक एच.जी आव्हाड, खानपान निरीक्षक शकील खान, जीआरपी पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे व अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.