चेन्नई : करुण नायरचे धडाकेबाज त्रिशतक, लोकेश राहुलचेएका धावेने हुकलेल्या द्विशतकानंतर सर रविंद्र जडेजाच्या घातकी फिरकीच्या बळावर टीम इंडियाने इतिहास रचला. पाचव्या कसोटीत इंग्लंडला 1 डाव 75 धावांनी हरवून, भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. कसोटी क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात भारताने पहिल्यांदाच इंग्लंडवर 4-0 इतक्या मोठ्या फरकाने विजय साजरा केला आहे. तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने एखाद्या संघावर 4-0 अशी मात करण्याची ही दुसरीच वेळ आहे. 2013 साली भारताने ऑस्ट्रेलियाला 4-0 ने नमविले होते. आता विराटच्या यंग ब्रिगेडने इंग्लंडला 4-0 ने लोळविले. 1932 सालापासून भारतीय संघ आजवर 152 कसोटी मालिकांमध्ये खेळला आहे. त्यात केवळ दुसऱ्यांदाच भारताने 4-0 असा विजय मिळवला आहे.
करुण, लोकेश अन जडेजा सामन्याचे हिरो
करुण नायरच्या खणखणीत त्रिशतकानंतर रवींद्र जाडेजाच्या भेदक गोलंदाजीमुळे, भारताने चेन्नई कसोटीतही तिरंगा फडकवला. टीम इंडियाने इंग्लंडला पाचव्या कसोटीतही पाणी पाजून, मालिका 4-0 ने खिशात टाकली आणि ऐतिहासिक विजयाची नोंद केली. चेन्नई कसोटी भारताने 1 डाव आणि 75 धावांनी जिंकली. करुण नायर या विजयाचा नायक आहे. 199 धावा ठोकणारा सलामीवीर लोकेश राहुल आणि इंग्लंडचा अर्ध्यापेक्षा जास्त संघ तंबूत धाडणार रवींद्र जाडेजा यांची कामगिरी देखील जबरदस्त झाल्याने टीम इंडियाने हा मोठा आणि चुरशीचा झालेला सामना खिशात घातला. जाडेजाने दुसऱ्या डावात तब्बल 7 विकेट घेतल्या. त्यामुळे इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 207 धावांवर आटोपला.