85 दिवसात काढली 400 ट्रक जलपर्णी

0

पिंपरी (प्रतिनिधी) – रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई’ या अभियानाचा रविवारी 85 वा दिवस उत्साहात पार पडला. यादिवशी तब्बल 400 ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या स्वच्छता दूतांना यश आले आहे.

जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई या अभियानात रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे पदाधिकारी व सदस्यांसह इंदिरा महाविद्यालयाचे 25 विद्यार्थी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ इ.एन.टी. मॉडर्न कॉलेजचे विद्यार्थी, तसेच पीसीसीएफ, सावरकर मित्र मंडळ, पोलिस नागरिक मित्र, भावसार व्हिजन इंडिया, लेवाशक्ति सखी मंच, जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळ, समता भातृ मंडल, लेवा संगिनि मंडळ, संस्कार प्रतिष्ठान आदी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अभियंता प्रवीण लडकत, हरीश मोरे आणि मित्र परिवार आदींनी सहभाग घेतला.

* रावेत बंधार्‍यावर स्वच्छता अभियान!
आजच्या अभियानात विविध संघटनांचे सुमारे 350 लोक सहभागी झाले. सोमनाथ मुसुडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज 40 ते 50 मजूरांमार्फत जांबे ते चिंचवड दरम्यान असलेल्या विविध घाटांवर हे अभियान राबविण्यात येत आहे. येत्या रविवारी रावेत बंधार्‍यावर हे अभियान राबविण्यात येणार आहे. परिसरातील सर्व पर्यावरण प्रेमी आणि पवनामाई भक्तांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रोजेक्ट डायरेक्टर मयुर बाळासाहेब वाल्हेकर यांनी केले.

* वाढदिवशी समाजोपयोगी काम!
संस्कार प्रतिष्टानच्या संदीप रांगोळे यांचा येत्या 30 जानेवारी रोजी वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसादिवशी समाजोपयोगी काम आपल्या हातून घडावे या उद्देशातून त्यांनी या अभियानास 1001 रुपयांची वैयक्तिक मदत दिली. जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई अभियानात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी आभार व्यक्त केले.