सांगवी:पिंपळे निलखमधील नऊ वर्षीय साई कवडे या लहान मुलाने हिमालयातील 16 हजार 500 फूट उंच शिखर सर केले. अशी कामगिरी करणारा भारतातील सर्वात लहान मुलगा ठरला आहे. लेह-लडाख येथे स्टोक कांगरी बेसकॅम्प ट्रॅक यशस्वीपणे पूर्ण करत 16 हजार 339 फुटांवर भारताचा तिरंगा फडकावला. महाराष्ट्रातील आघाडीच्या ग्रुपने मिशन स्वप्नपूर्ती अंतर्गत ही मोहीम आखली होती. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे व साईचे वडील सुधीर कवडे या मोहिमेध्ये सहभागी झाले होते. मोहिमेचे सर्व श्रेय साईची ताकद ओळखून स्टोक कांग्री मोहिमेची पायाभरणी करणारे गिर्यारोहक अनिल वाघ यांना देतो. यापूर्वी साईने महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ले सर केले असून लिंगाणा ही अतिशय अवघड चढाईही केली. गेल्या सहा महिन्यांपासून साईने विविध कसरती करत या मोहिमेची तयारी केली होती. त्यांना गिर्यारोहक अनिल वाघ, सुरेंद्र शेळके, डॉ.नरेंद्र पाटील, डॉ.भूषण यांचे मार्गदर्शन लाभले.
हे देखील वाचा
नेपाळमधील शेरपाही सहभागी
या मोहिमेत खास नेपाळवरुन फुरबा व लेहमधील सॅम असे दोन शेरपा साईसोबत सहभागी झाले होते. दि. 30 सप्टेंबरला या मोहिमेची सुरुवात झाली. अत्यंत कमी ऑक्सिजन असलेल्या लेह भागात नऊ वर्षाच्या साईने दि. 4 सप्टेंबरला दुपारी साडेबारा वाजता बेसकॅम्पवर यशस्वी आरोहण केले. साई सध्या बालेवाडी पुणे येथील भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चौथी इयत्तेत शिकत आहे. सोलापूर हे त्याचे आजोळ आहे.