9 लाखांचे चंदन जप्त

0

यवत । चंदनाच्या लाकडाची चोरून वाहतूक करणारे वाहन यवत पोलिसांनी पकडले असून 25 हजार रुपयांची चंदनाची लाकडे आणि महिंद्रा झायलो मोटार असा एकूण 9 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खंडू जाधव (वय 23), तुषार काळे (वय 24, दोघेही रा. अहमदनगर) त्यांची नावे आहेत. पोलिस नाईक दशरथ बनसोडे यांना खबर्‍यामार्फत चंदनाचा साठा घेऊन झायलो मोटार शिरूरवरून सातार्‍याकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी पोलिस उपनिरीक्षक राहुल यादव, गणेश पोटे, दशरथ बनसोडे, गणेश झरेकर, दीपक पालके आदींच्या मदतीने केडगाव-चौफुला ते सुपा रोडवर सापळा लावला. त्यावेळी एक सोनेरी रंगाची महिंद्रा झायलो मोटार भरधाव वेगात सुपा बाजूकडे जाताना दिसली. यावेळी पोलीस पथकाने तात्काळ मोटारीचा खासगी जीपने पाठलाग करून मोटार थांबवली. मोटारीची तपासणी केली असता यामध्ये दोन व्यक्ती पाठीमागील सीटच्या खाली पांढर्‍या गोणीमध्ये चंदनाची लाकडे घेऊन जाताना आढळले.