मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी एकवटलेल्या मराठा समाजाने अखेर मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून 9 ऑगस्ट रोजी हा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शहर असून या शहरात मराठा क्रांती मोर्चा यशस्वी झाल्यास सत्ताधार्यांसाठी हे अधिक तापदायक ठरणार आहे. त्यामुळे मराठा नेत्यांनी आरक्षणाच्या मागणीला मार्गी लावण्यासाठी कंबर कसली आहे. नेहमीप्रमाणे हा मोर्चाचा शिस्तबद्ध, मूक आणि शांततेचा दर्शन घडवणारा असणार आहे. या मोर्चाची मुख्य जबाबदारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या भागातील मराठा समाजाच्या विविध संस्था आणि संघटना यांना देण्यात आली आहे.
मराठा आमदारांनी कंबर कसली
9 ऑगस्टला क्रांती दिनी मराठा समाजाचा हा महामोर्चा मुंबईत काढण्यात येणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी मराठा आमदार आणि आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाली. ज्यामध्ये मराठा समाजात काम करणार्या प्रमुख संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार विनायक मेटे, भाई जगताप, प्रवीण दरेकर, सुरेश हाळवणकर, स्मिता वाघ, उमेष पाटील, आर. टी. देशमुख आदी आमदार उपस्थित होते. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवसंग्राम, अ.भा. छावा मराठा युवा संघटना, बुलंद छावा, शिवक्रांती सेना, संभाजी सेना, भारतीय मराठा सेवा संघ, मराठा आरक्षण संघर्ष समिती, बळीराजा संघटना, स्वाभिमानी संघटना आदी प्रमुख संघटनांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीत मराठा संघटनांशी चर्चा करुन पुढची भूमिका निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
राजकारणी मोर्चाच्या पाठीच राहणार
मराठा क्रांती मोर्चाची पहिल्यापासूनची विशिष्ट कार्यपद्धत ठरवून देण्यात आली आहे. ज्यामध्ये मराठा समाजातील महिला, त्यानंतर पुरुष आणि शेवटी राजकीय पुढारी या मोर्चातून मार्गक्रमण करत असतात. मुंबईतील या मोर्चातही नेतेमंडळी मोर्चाच्या शेवटी चालणार आहेत. समाज देईल ती जबाबदारी आम्ही पार पाडू, पण काही करुन मोर्चा यशस्वी झालाच पाहिजे, असे आमदार विनायक मेटे, भाई जगताप, प्रवीण दरेकर, सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. नेत्यांनी मराठा समाजाची आजवर फसवणूक केली हा समाजाचा संताप होता तो आम्हाला मान्य आहे. पण आता सर्वांनी मोर्चा होईतोपर्यंत सर्व शक्ती एकत्र करा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
फूट पडण्यापासून सतर्क
दरम्यान या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज एकवटला आहे. त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न याआधीपासून सत्ताधारी पक्षाकडून होत आला आहे. मात्र वेळोवेळी मराठा समाजाकडून यासाठी सतर्कता बाळगली. त्यामुळे सत्ताधार्यांना हे शक्य झाले नाही. मात्र मराठा समाजाच्या वतीने कुणाशी बोलायचे हा मुद्दा सरकारने वेळोवेळी उपस्थित केला. त्याला मराठा समाजाकडून प्रतिसाद देण्यात आला नाही, परंतु आमदारांच्या बैठकीत सरकारशी चर्चा करण्यासाठी वेगळी समिती स्थापन न करता मोर्चेकरांचे प्रतिनिधीत्व करणारे शिष्टमंडळ स्थापन करून ते सरकारशी चर्चा करेल, असे ठरवण्यात आले. त्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली हे शिष्टमंडळ ठरवण्यात आले. एकूण 22 मागण्या मराठा समाजाच्या आहेत. मात्र यावेळी कुठेही शेतकरी संपामध्ये जशी फूट पडली, तशी फूट पडणार नाही, याची सतर्कता मराठा समाजाने घेतली आहे.