9 मार्चला मुंबई महापौरपदाची निवड

0

मुंबई । मुंबईचा महापौर 9 मार्चला निवडला जाणार आहे. महापौरपदासाठी 6 मार्चला उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. मुंबईच्या महापौरपदासाठी सेना-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली. पालिकेत आपलाच महापौर बसावा यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे. यंदा महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असून, शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांतून मोठ्या प्रमाणात इच्छुक दिसून येत आहेत. शिवसेनेकडून 6 नवनिर्वाचित नगरसेवकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. शिवाय 3 माजी महापौरांनाही संधी दिली जाऊ शकते.

शिवसेनेकडून महापौरपदासाठी 9 नावे चर्चेत
शिवसेनेकडून महापौरपदासाठी 9 नावे चर्चेत आहेत. आशिष चेंबूरकर, (15 वर्षे अनुभव, माजी बेस्ट समिती अध्यक्ष, विभागप्रमुख), मंगेश सातमकर,(10 वर्षे अनुभव), यशवंत जाधव, (शिवसेना उपनेता), रमेश कोरगांवकर, राजुल पटेल, (अनुभवी चेहरा), किशोरी पेडणेकर, (अनुभवी नगरसेविका, संपर्कप्रमुख), विशाखा राऊत( जुना अनुुभव) मिलिंद वैद्य( जुना अनुभव), श्रद्धा जाधव (जुना अनुभव).

भाजपमधील महापौरपदासाठी 4 संभाव्य नावे
भाजपमध्ये स्पर्धेत असलेली चार संभाव्य नावे उघड झाली आहेत. डॉ. राम बारोट, माजी आमदार अतुल शहा, अनुभवी नगरसेवक मनोज कोटक आणि शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले, माजी सभागृह नेता प्रभाकर शिंदे.

पालिकेकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, त्यानंतर राजकीय पक्षांना आपल्या उमेदवारांची यादी कोकण भवनला सादर करावी लागते. महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज स्थापन करण्यापूर्वी राजकीय पक्षांना गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. सध्याच्या पालिका सभागृहाची मुदत 8 मार्चला संपणार असल्याने 9 मार्च रोजी नवीन सभागृह आणि महापौर अस्तित्त्वात येणे आवश्यक आहे. यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया होईल. या प्रक्रियेनंतर 31 मार्चपूर्वी स्थायी समितीमध्ये अर्थसंकल्प सादर करून मंजूर करून घेतला जाणार आहे. त्यामुळे शिवसेना भाजप यांना आता लवकरात लवकर आपल्या युतींची समीकरणे जुळवावी लागणार आहेत. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तेमध्ये शिवसेना सहभागी असून, मुंबईत भाजपला सत्तेत सहभागी करून न घेतल्यास किंवा युती न केल्यास त्याचे राजकीय पडसाद उमटतील. सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होईल. त्यामुळे भाजपला युतीचा प्रस्ताव पाठवावा, असे मत शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते.