9 मिनिटात 57 विषयांना मंजुरी

0

भुसावळ। तब्बल पाच महिन्यांनी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी 27 मार्चच्या सर्वसाधारण सभेला नियमबाह्य ठरवण्याची मागणी करीत सत्ताधार्‍यांनी जाब विचारल्याने गोंधळ वाढल्याने सत्ताधार्‍यांनी आवाजी मतदानाने सर्व विषयांना मंजुरी देत सभागृहाबाहेर पाय काढला. अवघ्या 9 मिनिटात सर्व नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली. या प्रकारानंतर विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त करीत सभा सुरू ठेवण्याची मागणी केली मात्र तो पर्यंत सत्ताधार्‍यांनी सभागृह सोडल्याने विरोधक संतप्त झाले. जिल्हाधिकार्‍यांकडे जनआधारने झाल्या प्रकाराची तक्रार केली तर सत्ताधार्‍यांनी लागलीच अहवाल रवाना केला. मंगळवारी पालिकेच्या सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता हाजी मुन्ना तेली, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांची उपस्थिती होती. चीनमधील स्पर्धेत विजय मिळवणार्‍या गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचा ठराव नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांनी मांडला.

सत्ताधार्‍यांच्या भूमिकेमुळे विरोधक संतप्त
पालिकेच्या सभागृहात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावल्यानंतर 11.15 वाजता प्रत्यक्षात सभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्याने विरोधकांनी संतप्त होत 27 मार्चची बैठक नियमबाह्य असल्याचे सत्ताधार्‍यांना धारेवर धरत असताना सत्ताधार्‍यांनी 11.27 वाजता सर्व विषय मंजूर असल्याचे सांगत सभागृह सोडल्याने नगरसेविका पुष्पा सोनवणे, उल्हास पगारे, रवी सपकाळे, दुर्गेश ठाकूर आदींनी तीव्र संताप व्यक्त करीत सभा सुरू ठेवण्याची मागणी केली. पुष्पा सोनवणे यांनी सत्ताधार्‍यांना बांगड्यांचा आहेर देत असल्याचे सांगितले.

आक्षेपार्ह विषय नसताना गोंधळ
पालिकेच्या सर्वसाधारण सभेत कुठलेही आक्षेपार्ह विषय नसताना विरोधकांनी गोंधळ घातला, अशी माहिती नगराध्यक्ष रमण भोळे यांनी दिली. ते म्हणाले की, जीएसटी लागू झाल्यानंतर विविध विकासकामांचे विषय मंजूर करण्यास बाधा येत होती मात्र आजच राज्य शासनाचे या संदर्भात पत्र पालिका प्रशासनाला प्राप्त झाले आहे. शहरात विकासकामे होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आजच्या बैठकीत विविध विकासाचे विषय घेण्यात आले होते मात्र विरोधकांनी काहीएक कारण नसताना गोंधळ घातला. अशा गोंधळाला भिवून आम्ही शहराचा विकास थांबू देणार नाही. पावसाळ्यातही शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात आला शिवाय रस्ते व गटारींची कामे तसेच विकासकामे आता सुरू होतील. पथदिव्यांचा प्रश्‍न मार्गी लागला आहे.

सभा रद्द करण्याची मागणी
जनआधार विकास पार्टीच्या नगरसेवकांनी मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांकडे सभा करण्याची मागणी केली. नगराध्यक्षांनी सभा चालू दिली नाही, जनहिताच्या प्रश्‍नांवर कुठलीही चर्चा झाली नाही त्यामुळे मुख्याधिकार्‍यांकडून प्रोसेडींग बुक जप्त करावे अशी मागणी निवेदनाद्वारे उल्हास पगारे, दुर्गेश ठाकुर, संतोष त्र्यंबक चौधरी, राहूल बोरसे, शेख जाकिर शेख सरदार, बागवान इकबाल सरदार, संगीता देशमुख, खान शब्बाना सिकंदर, शेख शब्बीर जयारबी शेख, नीलिमा पाटील आदींनी केली.