9.72 लाख खातेदार रिझर्व्ह बँकेच्या रडारवर

0

नवी दिल्ली- नोटाबंदीनंतर 2.89 लाख कोटी रुपयांची रोख रक्कम बँकेमध्ये भरणारे 9.72 लाख लोक रडारवर असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दिली आहे. या ठेवीदारांनी 13.33 लाख बँक खात्यांचा वापर ही रक्कम जमा करण्यासाठी केला आहे. काल बुधवारी रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी भारताच्या मध्यवर्ती बँकेने ही माहिती दिली आहे.

कर्जदार कंपन्यांनाही इशारा
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी एका परिषदेला संबोधित करताना थकबाकीदार कंपन्यांना इशारा दिला. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी वटहुकूम काढून रिझर्व्ह बँकेला 500 कोटींपेक्षा अधिक थकीत कर्ज असणार्‍या 12 कंपन्यांवर दिवाळखोर संहितेनुसार कारवाई करण्याची परवानगी दिली होती. दिवाळखोर संहितेनुसार सरकारने पहिल्यांदाच थकबाकीदार कंपन्यांवर कारवाई केली असेल असा दावा जेटलींनी केला. सरकार बँकांना जास्तीत जास्त भांडवल उपलब्ध करुन देण्यास तयार आहे. मात्र कर्ज थकवणार्‍यांकडून वसूली करणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींचा फ्लॉप-शो
दरम्यान, तृणमुलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी नोटाबंदीवरून जोरदार हल्ला चढविला. नसबंदीच्या सक्तीमुळे इंदिरा गांधी यांचे सरकार पडले होते. तर नोटाबंदीमुळे मोदी सरकारचे पतन होईल अशा शब्दात त्यांनी टीका केली. तर नोटाबंदी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्लॉफ शो असल्याचेही ते म्हणाले. तर दुसरीकडे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्विट करून नोटाबंदीच्या निर्णयाची खिल्ली उडविली. त्यांनी म्हटले की, बंद करण्यात आलेल्या नोटांच्या स्वरूपात 15,44,000 कोटी रुपये चलनात होते. त्यापैकी फक्त 16,000 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळालेले नाहीत. याचा अर्थ नोटाबंदीतून रिझर्व्ह बँकेला काळ्या पैशाच्या स्वरूपात 16,000 कोटी रुपयांचा लाभ झाला.