९ ऑगस्ट रोजी देशभरात ‘ईव्हीएम भारत छोडो’ आंदोलन !

0

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा खापर विरोधकांनी ईव्हीएमवर फोडले आहे. दरम्यान भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील इंग्रजांविरुद्धच्या ‘भारत छोडो’ चळवळीच्या धर्तीवर येत्या ९ ऑगस्ट रोजी देशभरात ‘ईव्हीएम भारत छोडो’ आंदोलन करण्यात येणार आहे. ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाच्या वतीने मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय जनआंदोलनाचे निमंत्रक रवी भिलाणे व फिरोझ मिठीबोरवाला यांनी ही घोषणा करण्यात आली.

केंद्रातील सध्याचे सरकार हे लोकांच्या मतांवर निवडून आलेले नसून ते ईव्हीएम सरकार आहे. या ईव्हीएम सरकारने केलेली चोरी उघड झाली आहे. त्या विरोधात आता देशभरातील जन संघटना रस्त्यावर उतरणार आहे. आंदोलनाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी देशभरातील शेकडो शहरात एकाच वेळी ईव्हीएम विरोधी आंदोलन करण्यात येणार आहे. तर, मुंबईत दादर येथील चैत्यभूमी ते ग्राण्ट रोड येथील ऑगस्ट क्रांती मैदानपर्यंत लाँगमार्च काढण्यात येणार आहे. सर्व धर्मीय मुंबईकर जनतेच्या वतीने सिद्धिविनायक मंदिर, पोर्तुगीज चर्च, वरळी नाका, हाजी अली या ठिकाणी लाँगमार्चचं भव्य स्वागत केलं जाणार असल्याची माहिती धनंजय शिंदे आणि ज्योती बडेकर यांनी दिली.