नंदुरबारातील ९ लाखांच्या घरफोडीची पथकाकडून अवघ्या काही तासात उकल
भाडेकरूच निघाला चोर; पोलिसांच्या पथकास पोलीस अधीक्षकांनी केले रोख बक्षीस जाहीर
नंदुरबार प्रतिनिधी
शहरातील पटेलवाडी परिसरात शझालेली ९ लाख रुपयांची घरफोडी फिर्यादीनेच केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे. हा गंभीर गुन्हा अवघ्या काही तासात उघड करुन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकास पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रोख बक्षीस जाहीर केले आहे.
सविस्तर असे, शेख युसुफ शेख चांद (वय५३, रा. प्लॉट नंबर-११५, पटेलवाडी, नंदुरबार) यांच्या राहत्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात आरोपीने २ ते ४ मे दरम्यान घरातील कपाटामधून ८ लाख ९७ हजार २५० रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले. म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्याचवेळी शेख युसुफ शेख चांद यांच्या घरात भाडेकरु म्हणून ३ वर्षापासून राहत असलेले जुबेर इब्राहिम शहा याने ही त्यांच्या राहत्या घरात चोरी झाल्याबाबत सांगितल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले.