सोनभद्र: जमिनीच्या वादातून गोळ्या घालून ९ जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील घोरवाल भागात घडली आहे. आज बुधवारी १७ रोजी ही घटना घडली. या हिंसाचारात १९ जण जखमीही झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिलांचा समावेश आहे.
घोरवाल येथील सापही गावात ही घटना घडली असून जमिनीच्या वादातून दोन गटातमध्ये हाणामारी सुरु झाली यावेळी काही जणांनी गोळीबारही केला. त्यानंतर पळापळ सुरु झाली यामध्ये ९ लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच डीजीपींना व्यक्तिगतरित्या या प्रकरणात लक्ष घालून चौकशीचे तसेच दोषींना पकडण्यासाठी प्रभावीपणे कारवाईचे निर्देश दिले आहेत. पोलीस महानिरिक्षक प्रवीण कुमार यांनी सांगितले की, या गावातील सरपंचाने २ वर्षांपूर्वी ९० एकर जमीन खरेदी केली होती. त्यानंतर तो आपल्या काही सहकाऱ्यांसोबत ही जमीन ताब्यात घेण्यासाठी गेला. त्याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला त्यानंतर मोठा वाद झाला. त्यानंतर त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला.