पालिकेत बोकाळला भ्रष्टाचार ; तर अल्प किंमतीत जनधार देणार टँकर
भुसावळ- पालिकेत भ्रष्टाचार बोकाळला असून अवघ्या 90 हजारांना मिळणारे टँकर सत्ताधार्यांनी तब्बल अडीच लाखांना खरेदी केल्याचा आरोप जनआधार विकास पार्टीचे गटनेता उल्हास पगारे यांनी केला असून या संदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. सत्ताधारी व मुख्याधिकार्यांनी टँकर खरेदीत तब्बल चार ते पाच लाखांचा भ्रष्टाचार केला असून या प्रकरणी चौकशी होवून गुन्हा दाखल होण्याच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सत्ताधारी केवळ विकासाच्या गप्पा करीत असून प्रत्येक बिलात घोटाळा सुरू आहे. जनआधार विकास पार्टी अवघ्या दोन लाख 70 हजारात टँकरचा पुरवठा करण्यासाठी तयार आहे, पालिकेने त्याबाबत तयारी दर्शवावी, असे खुले आव्हानच पगारे यांनी दिले आहे. या संदर्भातील तक्रार ते जिल्हाधिकार्यांकडे करणार आहेत. सोमवारीच पालिकेने तीन टँकरचे लोकार्पण केल्यानंतर जनआधारच्या गटनेत्यांनी पत्रक काढले हेदेखील विशेष! दरम्यान, नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, या प्रकारे आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. या संदर्भात माहिती घेऊन आपण आपली भूमिका लवकरच मांडू.