वल्लभनगर आगारातून एकही गाडी पडली नाही बाहेर
पिंपरी-चिंचवड : एसटी कर्मचा-यांनी पगारवाढ व इतर मागण्यांसाठी बेमुदत बंद घोषित केल्याने वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. वल्लभनगर आगार येथील जवळपास 90 गाड्यांच्या फेर्या बंद राहिल्या, अशी माहिती वल्लभनगर आगाराचे व्यवस्थापक एस.एन. भोसले यांनी दिली. या आगारातून बाहेर गेलेल्या गाड्याच तेवढ्या परत येत असून या आगारातून आतापर्यंत एकही बस गाडी सोडण्यात आलेली नाही. याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. रात्रीपर्यंत 90 गाड्यांपैकी एकही गाडी बाहेर पडलेली नाही. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक संप पुकारल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
दापोडी कार्यशाळेत निदर्शने
दापोडी येथील एसटी वर्कशॉप येथे कामगारांनी निदर्शने केली. पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी कर्मचा-यांनी हा अघोषित संप पुकारला. मात्र कोणत्याही कर्मचारी संघटनेने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. कर्मचारी उत्स्फूर्तपणे या संपात सहभागी होत आहेत. यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड वल्लभनगर आगार येथील एसटीची चाके थांबली आहेत. शासनाला प्रवाशांचे व कर्मचा-यांचे अधिक हाल होऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी आमच्या मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात, असे संपकरी कर्मचा-यांनी म्हटले आहे.
या आहेत मागण्या
पदनिहाय वेतनश्रेणी देण्यात यावी, एसटीच्या एक लाख दोन हजार कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, वेतनाबाबत सुधारित करार होत नाहीत तोपर्यंत 25 टक्के हंगामी पगारवाढ दिली जावी.
खासगी वाहतुकदारांची दिवाळी
संपामुळे खासगी वाहतुकदारांची मात्र दिवाळी झाली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासभाड्यात वाढ करत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे लुबाडण्याचे काम खासगी वाहतुकदारांकडून केले जात आहे. खासगी वाहतुकीची चिंचवड ते मुंबई असा हा प्रवास 200 ते 300 रुपयात होतो, मात्र आजच्या संपामुळे हा प्रवास 400 ते 500 रुपये आकारला जात आहे.