90 वर्षानंतरही मनुवादी विचारसरणी जीवंत

0

जळगाव । 25 डिसेंबर 1927 रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी मनुस्मृतीचे महाड येथे दहन केले आणी बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले. त्यानंतर खर्‍या अर्थाने जातीवादी समाजरचनेतून मुक्तता मिळेल असे वाटत होते परंतु अद्यापही 90 वर्षानंतर जातीवाद नष्ट झालेला नाही हे पुणे येथे सोवळे मोडल्या प्रकरणी पोलीसात मोलकरणी विरोधात डॉ.मेधा खोले यांनी गुन्हा दाखल केले आणि पोलीसांनीही गुन्हा दाखल करुन घेतल्याच्या प्रकरणातून दिसून येते. यातून जातीवाद नष्ट झालेला नसून मनुवादी विचारसरणी समाजमनावर घट्ट चिकटून बसलेली असल्याचे पुन्हा एकदा दिसून येते असे प्रतिपादन प्रा.डॉ.अंजली मायदेव आंबेडकर यांनी केले. प्रगतीशील लेखक संघ, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, जळगाव जिल्हा महिला असोसिएशन आणि समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर 6 वे विचार संमेलनाच्या बीजभाषण प्रसंगी बोलत त्या बोलत होत्या.

स्त्री प्रतिमा ठरवावी
संस्काराची सुरुवात ही गर्भसंस्कारपासून झाली पाहिजे असे प्रत्येकांना वाटते त्यासाठी महापुरुषांचे चरित्र वाचावे असे सांगितले जाते. महापुरुषांचेच चरित्र का वाचावे? स्त्रीया महान नाहीत का? स्त्री चरित्र वाचनातून गर्भसंस्कार होणार नाही का? असा प्रश्‍न करीत डॉ.अंजली आंबेडकर यांनी पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीयांनी स्वःप्रतिमा ठरविण्याचे आवाहन केले. स्त्रीयांना गौरी लंकेश यांची प्रतिमा हवी की डॉ.मेधा खोलेंची प्रतिमा हवी हे त्यांनीच ठरवावे असा उपदेशही त्यांनी यावेळी केला.

व्यक्ती स्वातंत्र्य जपावे
राज्यघटनेने प्रत्येक नागरिकांना व्यक्ती स्वातंत्र्य बहाल केले आहे, मात्र अलीकडच्या कालखंडात काय खावे आणि काय खाऊ नये यावरही निर्बंध लादण्यात येत आहे. काय खावे आणि काय खाऊ नये हे व्यक्ती स्वातंत्र्यावर आधारीत आहे यावर कोणीही निर्बंध आणू शकत नाही, व्यक्ती स्वातंत्र्य जपले गेले पाहिजे असे सांगत येत्या काही दिवसात महापुरुषांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही नाव येईल अशी बोचरी टीकाही डॉ.अंजली आंबेडकर यांनी केली. बाबासाहेबांचे प्रबुध्द भारत या नियतकालीकेला पुन्हा सुरु केल्याने डॉ.अंजली आंबेडकर यांना विविध संघटनेंच्या वतीने 11 हजाराची देणगी देण्यात आली.

कोडबील’करण्यासाठी
इंग्रजांचे राजवट येण्यापूर्वी देशात जे कायदे प्रचलीत होते त्यात प्रादेशिक भिन्नता, मनमानी कारभार होते. ते नष्ट करण्यासाठी इंग्रजांनी कायद्याचे संहितीकरण केले त्याला घटनात्मक विकास म्हटले जाते त्यालाच अनुसरुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ‘हिंदू कोडबील’ आणले होते. हिंदू कोडबील हे स्त्रीयांच्या कल्याणासाठी तर होतेच सोबतच ते संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होते मात्र राष्ट्रकल्पनेच्या नावाखाली हे बील हाणून पाडण्यात आले असे प्रतिपादन प्रा.देवेंद्र इंगळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबील या विषयावर बोलतांना केले. बीजेपी, आरएसएस, हिंदु महासभेची राष्ट्र कल्पना एकच असून ती संविधानिक नाही असा आरोपही प्रा. देवेंद्र इंगळे यांनी केले.

विविध विषयावर विचारमंथन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर 6 वे विचार संमेलनाचे उद्घाटन कॉ.डॉ.भालचंद्र कांगो, उत्तम कांबळे, डॉ.श्रीपाद जोशी यांच्या उपस्थितीत झाले. संमेलनात विविध विषयावर विचारमंथन करण्यात आले. यात प्रा.देवेंद्र इंगळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू कोडबील, डॉ.भारती पाटील यांनी स्त्री शिक्षणाची विद्यमान परिस्थिती, डॉ.रजीया पटेल यांनी अल्पसंख्यांक महिला आणि संविधान, विनया मालती यांनी जागतिकीकरणाचे महिलांवरील परिणाम विषयावर मत व्यक्त केले. यावेळी वासंती दिघे, मुकुंद सपकाळे, अविनाश पाटील, साजिद शेख, अश्फाक पिंजारी आदी उपस्थित होते. संमेलनाचे समारोपीय भाषण प्रा.पुष्पा भावे यांचे झाले.