मुंबई । बडोदा येथे 91व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाला गुरुवारी, 15 फेबु्रवारीपासून सुरुवात होणार आहे. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी पाच वाजता राजवाड्याच्या प्रवेशद्वारापासून ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागांतून फिरणार्या या दिंडींचा समारोप पुन्हा राजवाड्यांच्या प्रवेशद्वाराजवळ होणार आहे. दिंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात येणार असून शहरातील विविध मराठी संस्थांचे सदस्य व आखाडे यात सहभागी होणार आहेत. प्रारंभी राजवाड्याच्या प्रांगणात राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, श्रीमंत समरजित सिंह गायकवाड व महाराणी राधिकाराजे गायकवाड यांच्या हस्ते दिंडीची पूजा करण्यात येईल. या दिंडीत वीस चारचाकी वाहनांचा ताफा असणार आहे. संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, निमंत्रित साहित्यिक व कलावंत यात विराजमान असणार आहे. 16 ते 18 फेब्रुवारीदरम्यान महाराष्ट्राबाहेर गुजरातच्या भूमीत होणार्या या संमेलनात मायमराठीचा जागर करणारे परिसंवाद, काव्यसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, मुक्त चर्चा, अशी पर्वणी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.
‘पुण्यश्लोक महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी’ असे नाव संमेलनस्थळाला देण्यात आले आहे. साहित्यनगरीत ‘पुण्यश्लोक महाराजा रणजितसिंह गायकवाड संमेलनस्थळ’, ‘पु. आ. चित्रे अभिरुची ग्रंथदालन’, ‘चं.कि. महेता सभामंडप’, ‘माधव ज्युलियन सभागृह’, ‘काकासाहेब कालेलकर सभागृह’ अशी दालने बनवण्यात आली आहेत, तर पुण्यश्लोक महाराजा रणजितसिंह गायकवाड संमेलनस्थळाच्या व्यासपीठाला ‘कविवर्य विंदा करंदीकर’ यांचे नाव दिले आहे. ‘महाराजा सयाजीराव गायकवाड समग्र चरित्रसाधने’ या ग्रंथाचे प्रकाशन संमेलन उद्घाटन कार्यक्रमात होणार आहे.
संमेलनाचे उद्घाटन 16 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी, महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड, गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा, महापौर भरत डांगर, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मावळते संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 16 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. त्यानंतर डॉ. अक्षयकुमार काळे हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यानंतर मुख्य उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे.
17 फेब्रुवारीला संगीत पहाट
17 फेब्रुवारी रोजी पुण्यश्लोक महाराजा रणजितसिंह गायकवाड संमेलनस्थळ येथे पहाटे 6 वाजता गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल. सकाळी 9 ते 11 वाजता कविसंमेलन भाग 1 होणार असून त्याचे अध्यक्ष सुनील देशपांडे असणार आहेत. सकाळी 11 वाजता श्याम मनोहर आणि प्रकाशक डॉ. गंगाधर पानताकणे यांचा सन्मान, ‘महाराजा सयाजी गायकवाड यांची नवभारताची संकल्पना आणि योगदान ’परिसंवाद, ‘मराठी संत कवयित्रींची बंडखोरी आणि स्त्री-वाद’ परिसंवाद, ‘मराठी साहित्याचा सरकलेला केंद्रबिंदू – नागर ते नांगर ’टॉक शो, कथा, कथाकार, कथानुभक, बहुभाषिक कविसंमेलन, संध्याकाळी श्रीनिकास खळे संगीत रजनी.
न्या. चपळगावकर यांची मुलाखत
18 फेबुवारी रोजी पहाटे 6 वाजता संगीत पहाट ‘जसरंगी’, न्या. नरेंद्र चपळगावकर यांची मुलाखत, ‘अनुवाद : गरज, समस्या आणि उपाय’ परिसंवाद, प्रतिभावंतांच्या सहवासात, ‘राजकीय वास्तवाच्या समर्थ चित्रणापासून लेखक दूर का?’ हा परिसंवाद, बोलीतील कविता, काव्यवाचन. संध्याकाळी खुले अधिवेशन आणि संमेलनाचा समारोप होईल. त्यानंतर बडोदे कलावैभव कार्यक्रमात बडोद्यातील कलाकार कीर्तन, गौळण, नृत्य, नाट्य यांचा कलाविष्कार.