पुणे । यंदाचा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ’पिफ’ 11 ते 18 जानेवारी दरम्यान होणार असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील 10 स्क्रीनवर यातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. यंदाच्या महोत्सवाची प्रमुख थीम तरुणाई अशी निवडण्यात आली आहे. याबाबतची माहिती या महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ जब्बार पटेल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
उत्साहाने सळसळणार्या आणि स्वतःचा वेगळा विचार असलेल्या तरुणाईची भाषा चित्रपटांमधून वेगवेगवेगळ्या प्रकारे समर्थपणे व्यक्त होत आहे. हे लक्षात घेऊनच यावर्षी महोत्सवाची प्रमुख थीम तरुणाई अशी निवडण्यात आली आहे. तरुणाईचे भावविश्व उलगडणारे काही जागतिक दर्जाचे निवडक चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार असल्याचे जब्बार पटेल यांनी सांगितले. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रियेची माहिती www.piffindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकासह त्यांना सिटी प्राईड-कोथरूड, सिटी प्राईड-सातारा रस्ता किंवा मंगला चित्रपटगृह यांपैकी कोठेही जाऊन ’स्पॉट रजिस्ट्रेशन’ करावे लागणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही स्पॉट रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थी, ’फिल्म क्लब’चे सभासद व ज्येष्ठ नागरिक (60 वर्षांपुढील) यांना ओळखपत्र दाखवून रुपये 600 मध्ये नोंदणी करता येणार आहे, तर इतर इच्छुकांसाठी नोंदणी शुल्क रुपये 800 असणार आहे.