हिवरा आश्रम : बहुप्रतिक्षित 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भात होणार आहे. मानवहितकारी संत पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या सेवाकार्याने तपोभूमी ठरलेल्या विवेकानंद आश्रमाला या वर्षीचा यजमानपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे विदर्भाच्या प्रवेशद्वारावर सारस्वतांचा मेळा भरणार आहे. यजमानपदाबाबत एकमत नसल्याने रविवारी नागपूर येथील मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मतदान झाले यामध्ये 5 विरुद्ध 1 मताने हिवरा आश्रमवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आतापर्यंतच्या 300 वर्षाच्या मराठी साहित्याच्या परंपरेत संमेलनाचा मान बुलडाणा जिल्ह्याला एकदाही मिळालेला नाही. त्यामुळे यंदाचे संमेलन बुलढाणा जिल्ह्यातच व्हावे, अशी महाराष्ट्रातील साहित्यप्रेमींची मागणी होती. या संमेलनासाठी विवेकानंद आश्रम विश्वस्त मंडळानेही जोरदार प्रयत्न केले होते. त्यामुळेच पंचतारांकित आयोजनातून पहिल्यांदाच हिवरा आश्रमसारख्या त्याग व सेवाभूमीत आणि ग्रामीण संस्कृतीत साहित्य संमेलन होणार आहे.
एक विरुद्ध पाच फरकाने पसंती
91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळाची अधिकृत घोषणा रविवारी नागपुरात झाली. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भाला जोडणारा सेतू म्हणून ज्याची ओळख आहे त्या बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रमला या संमेलनाचे यजमानपद मिळाले. महामंडळाच्या नागपुरातील कार्यालयात विशेष झाली. या सभेत संमेलनस्थळ पाहणी समितीने आपला अहवाल सादर केला. दिल्लीतील आयोजक संस्थेने ऐनवेळी माघार घेतल्याने बडोदा व हिवरा आश्रम हे दोनच पर्याय महामंडळापुढे होते. परंतु, यातील एकाही स्थळावर एकमत होत नसल्याने अखेर मतदान घेण्यात आले. या मतदानात एक विरुद्ध पाच अशा फरकाने हिवरा आश्रमला पसंती मिळाली.
प्रबोधनाच्या चळवळीची परंपरा
राजमाता जिजाऊ, संत चोखामेळा, कविवर्य ना. घ. देशपांडे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर व हिवरा आश्रमची खरी ओळख असलेले मानवहितकारी संत पूज्यनीय शुकदास महाराज अशी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी परंपरा बुलडाणा जिल्ह्याला लाभली आहे. परंतु, अद्याप संमेलनाच्या यजमानपदाचा मान या जिल्ह्याला मिळालेला नव्हता, शिवाय संमेलनाची आयोजक संस्था स्वत: विवेकानंद आश्रम आहे. भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाचा प्रदीर्घ अनुभव या संस्थेकडे आहे. दोन हजार साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था व दोन हजार स्वयंसेवकांची शिस्तबद्ध फळीदेखील आश्रमात आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन संमेलन हिवरा आश्रमला दिले जाईल, अशी शक्यता होती. ती अखेर खरी ठरली.
यजमानपद हा सर्वोच्च सन्मान!
91वे साहित्य संमेलन आयोजनाची व मराठी सारस्वतांची सेवा करण्याची संधी साहित्य मंडळाने दिली आहे. हा आमचा सर्वोच्च सन्मान आहे. साहित्य सरस्वतीच्या उपासकांच्या सेवेत कुठलीही उणीव भासणार नाही. विवेकानंद आश्रम ही पूज्यनीय शुकदास महाराजांची तपभूमी आहे. युगप्रवर्तक स्वामी विवेकानंदांच्या क्रूतीशील विचारातून उभी राहिलेली अन सेवाधर्म श्रेष्ठ मानणारी ही संस्था आहे. अस्सल ग्रामीण संस्कृतीत आम्ही हा साहित्य सोहळा साजरा करू.
– संतोष गोरे, सचिव विवेकानंद आश्रम