हिवरा आश्रम/पुणे : 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळनिश्चित करण्याकरिता शनिवारी विवेकानंद आश्रमात आलेल्या मराठी साहित्य महामंडळाच्या स्थळपाहणी समितीने विवेकानंद आश्रमाच्या आयोजनक्षमतेबाबत अनुकूल मत व्यक्त केले आहे. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, इंद्रजीत ओरके, सुधाकर भाले, दादा गोरे, पद्माकर कुलकर्णी या सदस्यांचे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विवेकानंद आश्रमात आगमन झाले. तर शनिवारी संमेलनस्थळाची पाहणी समितीने केली. सद्या दिल्ली, बडोदा आणि विवेकानंद आश्रम या आयोजकांत चुरश असून, रविवारी नागपूर येथे मराठी साहित्य महामंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत समिती आपला अहवाल सादर करणार असून, त्यात सर्व महामंडळ सदस्य एकमताने साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करतील, अशी माहिती समितीप्रमुख डॉ. श्रीपाद जोशी यांनी दिली. हिवरा आश्रम हे मराठवाडा, खान्देश आणि विदर्भाचे प्रवेशद्वार असल्याने या मोठ्या प्रांतातील साहित्यरसिक व साहित्यिकांच्या आग्रहाचा विचार करून साहित्य महामंडळाने 91 वे साहित्य संमेलन हिवरा आश्रम येथेच घ्यावे, असा आग्रह यावेळी प्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र लांजेवार व अजिम नवाझ राही यांनी समिती सदस्यांकडे धरला. तर किमान 500 साहित्यिकांसह अडिच हजार साहित्यरसिकांची निवास, भोजन आणि इतर सोय विवेकानंद आश्रमाच्यावतीने करता येईल, ही बाब यावेळी विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी समितीला पटवून दिली.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्यासह स्थळपाहणी समितीने यापूर्वी राजधानी दिल्ली, बडोदा येथे भेटी दिल्या आहेत. संमेलन आयोजनासाठी एकूण सहा प्रस्ताव महामंडळाकडे आले होते. पैकी तीन आयोजकांत प्रमुख चुरश होती. आताही तीनही स्थळांची पाहणी समितीने केली आहे. स्थळपाहणी समितीने संमेलन आयोजनासाठी उत्सुक विवेकानंद आश्रमाच्या पदाधिकारीवर्गाशी सविस्तर चर्चाही केली. प्रवासाची सोय, निवास व भोजन व्यवस्था याबाबी प्रामुख्याने महत्वाच्या असल्याचे समितीने सांगितले होते. त्याबाबत आश्रमाच्या पदाधिकारीवर्गाने तीनही सोयींबाबत परिपूर्णता दाखवली. 500 निमंत्रित साहित्यिकांसह अडिच हजार साहित्यरसिकांच्या निवासस्थानाची उत्तम व्यवस्था विवेकानंद आश्रमाकडे असून, पिण्यासाठी आरओ पाण्याची सोय, गरम पाण्यासाठी सोलर सिस्टिम, संमेलनासाठी लागणारी चार भव्य व्यासपीठे व त्यासाठी अनुकूल मुबलक जागा, पुस्तकविक्रीसाठी स्टॉलकरिता लागणारी मुबलक जागा, आणि संमेलन यशस्वी करण्यासाठी लागणारी दोन हजार स्वयंसेवकांची फौज आदी विवेकानंद आश्रमाकडे असल्याची बाब आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी समितीच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार प्रत्यक्षपाहणी करून समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
यंदा अराजकीय संस्थेकडे यजमानपद द्या : लांजेवार
विदर्भ साहित्य संघाच्यावतीने ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र लांजेवार यांनी 91 वे साहित्य संमेलन हिवरा आश्रम येथेच घेण्यात यावे, अशी मागणी मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्याकडे केली. साहित्य संमेलने राजकीय पुढारीच यशस्वीरित्या आयोजित करू शकतात, असा संदेश समाजात गेला आहे. तेव्हा अराजकीय व सेवाभावी संस्थादेखील साहित्य संमेलन आयोजित करू शकते व यशस्वी करू शकते, हा संदेश समाजात जाण्यासाठी विवेकानंद आश्रमालाच संमेलनाचे यजमानपद द्यावे, असा आग्रह लांजेवार यांनी धरला. त्याला ज्येष्ठ कवी अजिम नवाज राही यांनीदेखील अनुमोदन दिले. साहित्य संमेलनस्थळ निश्चिती रविवारी महामंडळाच्या बैठकीत ठरेल. विवेकानंद आश्रम हे संमेलन यशस्वीरित्या आयोजित करू शकते, याबाबत आम्हाला विश्वास निर्माण झाला आहे. हा परिसर पाहून आम्ही समाधानी झालो आहोत. मानवहितकारी संत पूज्यनीय शुकदास महाराज व विवेकानंद आश्रमाच्या कार्याविषयी कालपर्यंत ऐकून होतो. आज प्रत्यक्षात हे सुंदर असे ठिकाण पाहाता आले. तेथून प्रेरणादायी विचार घेऊन जात आहोत, अशी भूमिका स्थळपाहणी समिती सदस्यांनी व्यक्त केली. त्यामुळे रविवारी स्थळनिश्चितीबाबत काय निर्णय होतो, याकडे साहित्यरसिकांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
साहित्य संमेलन हिवरा आश्रम येथे झाले तर ते यशस्वी करण्यासाठी विवेकानंद आश्रम कोणतीही कसर सोडणार नाही. त्यासाठी साहित्यरसिकांसह समाजातील सर्वांना सोबत घेतले जाईल. मानवहितकारी संत पूज्यनीय शुकदास महाराज यांचे कार्य व विचार जगाच्या कानाकोपर्यात नेण्यासाठी हे संमेलन येथेच व्हावे, असा आश्रमाच्या पदाधिकार्यांचा निर्धार आहे.*
– संतोष गोरे, सचिव विवेकानंद आश्रम