92 जणांच्या पासपोर्टला अटकाव

0

वाहतूक नियमभंगाचे गुन्हे दाखल : दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ

पुणे : वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणार्‍या वाहनचालकांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पासपोर्ट कार्यालयाला देण्याची कारवाई वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. वाहतूक नियमभंगाचे गुन्हे दाखल असलेल्यांपैकी 92 जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केले होते. मात्र, वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावरील प्रकरणांची माहिती दिल्याने पासपोर्ट कार्यालयाने त्यांना पासपोर्ट देण्यास अटकाव घातला आहे.

वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम

वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी विशेष मोहीम हाती घेतले आहे. नियमभंग करणार्‍या वाहनचालकांनी दंडाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करावी लागते. याबाबत त्यांना मोबाईलवर संदेश पाठविण्यात येतो. काहीजण दंड भरण्यास टाळाटाळ करतात. अशा वाहनचालकांची माहिती पासपोर्ट, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिसांच्या चारित्र्यपडताळणी विभागाला देण्याचा इशारा सातपुते यांनी दिला होता. जे वाहनचालक दंड भरत नाही, अशांनी पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केला होता. पासपोर्ट कार्यालयात अर्ज आल्यानंतर अशी प्रकरणे पोलिसांकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणार्‍या 92 जणांची यादी तातडीने त्या कार्यालयाकडे पाठविली. त्यानुसार त्यांच्या पासपोर्टला अटकाव घालण्यात आला आहे.