9334 कोटी काळा पैसा उघड!

0

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभाग व केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी)ने सुरू केलेल्या क्लीन मनी ऑपरेशनचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, देशभरातील 60 हजार खातेधारक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. या खात्यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. ऑपरेशनच्या पहिल्या टप्प्यात 9334 कोटींचा काळा पैसा उजेडात आल्याची माहिती प्राप्तिकरच्या सूत्राने दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. 9 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारीपर्यंत प्राप्तिकर विभाग व सीबीडीटीने देशभरातील सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवले होते. त्यानंतर मोठ्या रकमांतील संपत्ती खरेदीचे सहा हजारपेक्षा जास्त प्रकरणे, विदेशात पाठवलेला पैशाची सहा हजार सहाशे प्रकरणे या यंत्रणांच्या निदर्शनात आलीत. तसेच, मोठ्या रकमांचा व्यवहार करणारे 1300 लोकंही या यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.

काळा पैसा विदेशात गेला..
सीबीडीटीच्या अधिकार्‍यांनी सांगितले, की क्लीन मनीच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात रोख पैसे जमा करणार्‍यांचे डेटा विश्‍लेषण करण्यात आले आहे. 31 जानेवारीला क्लीन मनी ऑपरेशन सुरू करण्यात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात मोठा व्यवहार करणार्‍या 17.92 लाख लोकांना या व्यवहारांबाबत ऑनलाईन विचारणा करण्यात आली होती. त्यापैकी 9.46 लाख लोकांनी त्यांच्या व्यवहारांबाबत माहिती दिली होती. काळा पैसा पांढरा केला असा 1300 लोकांवर दाट संशय असून, 60 हजार लोकांची चौकशी करण्याची गरज आहे, अशी माहितीही सीबीडीटीच्या अधिकार्‍यांनी दिली. या लोकांनी विदेशात मोठी रक्कम पाठवणे, विदेशात संपत्ती खरेदी करणे, सोने खरेदी करणे आदींत पैसा गुंतविला असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण 9334 कोटी रुपयांचा काळा पैसा तूर्त उजेडात आला असल्याची माहितीही या अधिकार्‍यांनी दिली.

2362 छापे, 818 कोटींची संपत्ती जप्त
प्राप्तिकर विभागाने आतापर्यंत देशभरात 2362 छापे टाकले असून, या कारवाईत 818 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यात 622 कोटी रुपये रोख रकमेचा समावेश आहे. या शिवाय, 400 प्रकरणे अंमलबजावणी संचालनालय (ईडी), आणि 3400 पेक्षा जास्त प्रकरणे सीबीआयकडे चौकशीसाठी पाठविण्यात आले आहेत. काळा पैसा उजेडात आणण्यासाठी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) अतिशय कठोर असून, कारवाईनिहाय अहवाल मागवत आहे. या अहवालाची माहिती खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेत आहेत, अशी माहितीही प्राप्तिकरच्या सूत्राने दिली.