संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त

0

धुळे । जि ल्ह्यात बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च 2017 या कालावधीत, तर दहावीची परीक्षा 7 मार्च ते 1 एप्रिल 2017 या कालावधीत होत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने दक्षता घेत नियोजन करावे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2017 माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हा दक्षता समितीची सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ. विद्या पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल वडनेरे उपस्थित होते.

सैन्य भरती मेळाव्यासाठी सहकार्य करणार : डॉ. पांढरपट्टे
आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस, औरंगाबाद यांच्यातर्फे 23 एप्रिल ते 10 मे 2017 या कालावधीत आणि नऊ वर्षांनी होणार्‍या नियोजित सैन्य भरती मेळाव्याच्या यशस्वितेसाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितले. सैन्य् भरती मेळाव्याच्या पूर्व तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठकीत ते बोलत होते. यावेळी आर्मी रिक्रुटमेंट कार्यालयाचे कर्नल मोहनपाल सिंह, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय शिंदे, तहसीलदार दत्ता शेजूळ, संदीप भोसले (साक्री), महेश शेलार (शिरपूर), अमोल मोरे (धुळे), रोहिदास वारुळे (दोंडाईचा), माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक बी. जी. येरमे उपस्थित होते.

उपद्रवी केंद्रांवर कॅमेरामन नियुक्त
पोलिस निरीक्षक वडनेरे यांनी सांगितले, प्रत्येक परीक्षा केंद्रावर 4 पोलिस कर्मचारी तसेच महत्त्वाच्या विषयाच्या वेळी जादा पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात येईल. शिक्षणाधिकारी पाटील यांनी सांगितले, बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 43, तर दहावीच्या परीक्षेसाठी 62 केंद्रे आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 25 हजार 573, तर दहावीच्या परीक्षेसाठी 30 हजार 280 विद्यार्थी प्रवीष्ट होतील. दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी प्रत्येकी दोन केंद्रे उपद्रवी आहेत. तेथे बैठे पथक कार्यरत राहील. याशिवाय फिरते पथकेही कार्यरत राहतील. ते परीक्षा केंद्रांना भेटी देवून पाहणी करतील. उपद्रवी केंद्रांवर महत्त्वाच्या विषयाच्या पेपरच्या दिवशी कॅमेरामन नियुक्त करण्यात येतील.

प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सविस्तर माहिती
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले, देशासाठी प्राणार्पण करणार्‍या कर्तव्यनिष्ठ सैनिकी अधिकारी व जवानांची उज्ज्वल परंपरा आपल्या जिल्ह्यास लाभली आहे. अशा जवानांसाठी जिल्ह्यात सैन्य भरती मेळावा होत असून संरक्षण दलातील प्रतिष्ठेची, शिस्तप्रिय व सन्मान मिळवून देणार्‍या नोकरीची सैन्य भरती मेळाव्याच्या माध्यमातून संधी उपलब्ध होत आहे.कर्नल मोहनपालसिंह यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले, आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस अंतर्गत 9 जिल्ह्यांचा समावेश होतो. या मोहिमेतून उत्कृष्ट उमेदवारांची निवड करण्यात येते. या सैन्य भरती मेळावा निश्चित झाल्यास 23 एप्रिल 2017 पासून 125 अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक धुळे शहरात दाखल होईल. या मेळाव्यासाठी रोज साडेतीन ते चार हजार उमेदवार येतील, असा अंदाज आहे. त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे. सैन्य भरती मेळाव्याचे नियोजन निश्चित झाल्यावर व्यवस्थेची आवश्यकता भासेल, असेही सिंह यांनी सांगितले.