धुळे । जागतिक महिला दिनानिमित्त महिला मतदार नोंदणी वाढविणे आणि महिलांमध्ये मतदान प्रक्रियेसंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले.
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांमध्ये मतदान प्रक्रिया संदर्भात जागृती निर्माण करणेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे बोलत होते. यावेळी अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपजिल्हाधिकारी जे. आर. वळवी (निवडणूक), जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय शिंदे, तहसीलदार महेश शेलार (शिरपूर), संदीप भोसले (साक्री), अमोल मोरे (धुळे), रोहिदास वारुळे (दोंडाईचा), जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल वडनेरे, नायब तहसीलदार मिलिंद वाघ, प्रा. डॉ. संजय ढोडरे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी सांगितले, प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिला मतदार नोंदणी वाढविणे आणि महिलांमध्ये मतदार जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणेबाबत सूचीत केले आहे.