दोंडाईचा कृउबा निवडणुकीत 96.44 टक्के मतदान

किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत

16 जागांसाठी मतदान,34उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

शिंदखेडा (प्रतिनिधी) — दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काल शुक्रवारी 3060 पैकी 2951 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 96.44 टक्के मतदान झाले. शहरातील वरपाडा रोड भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान घेण्यात आले. मतदानाच्या वेळेला भाजपा प्रणित जयकिसान पॅनल व महाविकास आघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. मतदारांच्या मोठमोठ्या रांगा मतदान केंद्रात पहावयास मिळाल्या. पुरुष मतदारांसोबतच महिला मतदारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 जागांपैकी दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 16 जागांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. मतदान पेटीत भाजपचे विद्यमान सभापती नारायण पाटील, पी एल पवार, किशोर रंगराव पाटील, जिजाबराव पाटील, रमेश खैरनार, डॉ.दीपक बोरसे, तसेच महाविकास आघाडीचे प्रकाश पाटील, ललित वारुडे, सुनील लांडगे, दिलीप संतोष पाटील यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. आज दिनांक 29 एप्रिल रोजी शिंदखेडा येथील काकाजी मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांपैकी यापूर्वीच दोन जागा बिनविरोध झाल्या असून दोन्ही जागा भाजप प्रणित जय किसान पॅनलने जिंकल्या आहेत. उर्वरित 16 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत आ.जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे जयकिसान पॅनल व महाविकास आघाडीचे स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत झाली होती. या निवडणुकीत दोन्ही पॅनलच्या प्रमुख प्रचारकांनी आरोप प्रत्यारोप केले. याच निवडणुकीदरम्यान भाजपच्या गटात असलेले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांनी भाजपचा राजीनामा देऊन पुन्हा महाविकास आघाडीत प्रवेश केला. दोन्ही पॅनलच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत झाल्याने भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. भाजपतर्फे आमदार जयकुमार रावल तर महाविकास आघाडी तर्फे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर भामरे व संदीप बेडसे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची झाली.

काल शुक्रवारी 28 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. सकाळी आठ वाजता या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या मोठमोठ्या रांगा आढळून आल्या. मतदान प्रक्रियेच्या वेळेला मतदान केंद्राच्या आवारात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला. आ.जयकुमार रावल यांनीही रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. माजी मंत्री आ.जयकुमार रावल मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रात आले, त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली. यावर महाविकास आघाडीच्या शामकांत सनेर, संदीप बेडसे, ज्ञानेश्वर भामरे यांनी आक्षेप घेऊन भाजप कार्यकर्त्यांना मतदान केंद्राच्या आवारातून बाहेर काढण्याची मागणी केली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते व पोलीस यांच्यात काही वेळ वाद झाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर असलेल्या गेट जवळच ठिय्या मांडून भाजपचे नेते व कार्यकर्त्यांना देखील बाहेर काढावे अशी मागणी केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी हस्तक्षेप केल्याने परीस्थिती पूर्ववत झाली.आ.जयकुमार रावल मतदानाचा हक्क बजावून मतदान केंद्राच्या बाहेर आल्यावर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता.

सेवा सहकारी सोसायटीच्या अकरा जागांसाठी 1496मतदारांपैकी 1423(95.25 टक्के)मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

ग्रामपंचायत मतदार संघाच्या चार जागेसाठी 1098 मतदारांपैकी 1076( 98 टक्के)मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

हमाल मापाडी मतदार संघाचे एक जागेसाठी 468 मतदारांपैकी 452 (96.58 टक्के)मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

मतदान शांततेने पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी, सहाय्यक गणेश महाले शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे ,पोलीस उपनिरीक्षक मिलींद पवार, गायकवाड आदी सह मोठया प्रमाणात पोलिसबंदोबस्त तैनात करण्यात आला होता.निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश महाले कृउबा समितीचे सचिव पंडित पाटील हे सर्व आपल्या सर्व कर्मचा-यांसह तळ ठोकून होते.

     कृउबा समितीच्या निवडणुकीची आज मतमोजणी—–

दोंडाईचा कृउबा समितीच्या निवडणुकीची आज दि.29 एप्रिल रोजी येथील विरदेल रोड वरील काकाजी मंगलकार्यालयात सकाळी 9 वाजेपासून मतमोजणी सुरू होईल. मतमोजणी 8 टेबलांवर होणार असून प्रत्येक टेबलावर 5 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत व 15 कर्मचारी राखीव आहेत.दुपारी 1 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोज चौधरी यांनी पत्रकारांना सांगितले.