भुसावळ :ऑर्डनन्स फॅक्टरी खाजगीकरणाच्या भारत सरकारच्या निर्णयाविरोधात संरक्षण क्षेत्रातील एआयडीईएफ व आयएनडीडब्लूएफव्दारे 8 जानेवारी रोजी एक दिवसीय राष्ट्रीय संप पुकारण्यात आला असून या संपासाठी मंगळवारी आयुध निर्माणीत कामगारांचे संपाच्या बाबतीत मतदान घेण्यात आल्यानंतर 97 टक्के कामगारांनी संपाच्या बाजूने मतदान केल्याने संप अटळ मानला जात आहे.
प्रशासन नेतृत्वात मतदान
भारत सरकारच्या ऑर्डनन्स फॅक्टरी खाजगीकरणाच्या विरोधात तसेच ऑर्डनन्स फॅक्टरींना संरक्षण उत्पादन देण्यासाठी एआयडीईएफ व आयएनडीडब्लूएफव्दारे मंगळवारी सकाळी सहा वाजेपासून रेस्टशेड येथे प्रशासनाच्या नेतृत्वात मतदान घेण्यात आले. कामावर जाण्यापूर्वी कामगारांनी संपाबाबत मतदान केले. प्रशासकीय अधिकारी तरुण सागर, श्रमकल्याण अधिकारी आकाश वर्मा, लेबर ऑफिसर विवेक स्वामी यांच्या मार्गदर्शनाने नीलेश पाटील, नवीन गायकवाड, नितीन लोखंडे, आशिश परदेशी, सचिन नेमाडे यांनी मतदान प्रक्रिया पार पाडली. एफडीआयच्या नावाने भारत सरकार आयुध निर्माणींचे निगमीकरण करुन रक्षा उद्योग संपविण्याचा प्रयत्न करीत आहे, आदींसह अन्य मागण्यांसाठी एक दिवसीय संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. संपाचे मतदान यशस्वी करण्यासाठी युनियनचे महासचिव तथा जेसीएम चे सदस्य दिनेश राजगिरे यांच्या नेतृत्वाखाली युनियनचे दीपक भिडे, हिरालाल पारिस्कर, प्रविण मोरे, किशोर बढे, नाना जैन यांच्यासह युनियनच्या पदाधिकार्यांनी सहकार्य केले.
या मागण्यांसाठी संपाचा इशारा
रिक्त जागा भरणे, संरक्षण उत्पादनाचे निगमीकरण रद्द करणे, 274 नॉन कोअर घोषीत झालेले उत्पादने कोअर घोषीत करणे, उत्पादनावरील अधिक भार कमी करुन सॅलरी बजेट वेगळा करणे, कामाचे आठ तास ऐवजी नऊ तासांचा विरोध, नवीन पेंन्शन रद्द करणे, अनुकंपा भर्ती 100 टक्के करणे यासह अन्य 15 सुत्री मागण्यांसाठी संरक्षण कामगार संपावर जाणार आहेत.