पुनर्बांधणीचे आव्हान

0

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीड दशकाच्या आघाडीच्या कालखंडातील ‘दोघांचे भांडण…दोघांचा लाभ’ या राजकीय खेळीनुसारच भाजप व शिवसेनेने जोरदार यश संपादन केल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून येत आहे. राज्यातील राजकारणाचे याच दोन पक्षांभोवती ध्रुवीकरण होत असताना आता अक्षरश: भुईसपाट झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे आदी पक्षांच्या वाटचालीबाबत भलेमोठे प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाल्याचेही दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल हाती आल्यानंतर भाजपचा वारू चौखूर उधळल्याचे दिसून येत आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये या पक्षाला लक्षणीय यश मिळाले आहे. याच्या खालोखाल शिवसेनेनेही मुसंडी मारली आहे. या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षांसमोर पुनर्बांधणीचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. सर्व देशाचे लक्ष लागून असणार्‍या मुंबईच्या रणसंग्रामात तर विरोधी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरल्याचे दिसलेच नाही. संजय निरूपम, गुरुदास कामत, प्रिया दत्त, मिलिंद देवरा आदी नेत्यांमध्ये गटातटाचे राजकारण रंगल्याने पक्षावर दारुण स्थिती ओढवली आहे. उर्वरित महाराष्ट्रात अशोक चव्हाण आणि नारायण राणे यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये यश संपादन केले असले, तरी ते भाजपच्या झंझावातासमोर टिकणारे नाही. वर नमूद केलेल्या नेत्यांमध्येही फारसा सलोखा नसल्याचे आपल्याला दिसून येत आहे. प्रभावी प्रचाराअभावी आणि खरं तर चेहर्‍याअभावी काँग्रेसला अपयश आले आहे. भाजपने सोलापूर, अमरावतीसारख्या या पक्षाच्या ताब्यातील महापालिका हिसकावून घेत लातूरसारख्या जिल्ह्यातही जोरदार मुसंडी मारली आहे. या पराभवातून सावरण्यासाठी काँग्रेसला गटबाजीला आळा घालावा लागणार आहे. या निवडणुकीत ‘एमआयएम’च्या उमेदवारांनी केलेल्या मतविभाजनाचा काँग्रेसला अनेक ठिकाणी फटका पडल्याचे दिसून आले आहे. यामुळे एमआयएमने केलेले मतविभाजन हे भाजप-सेनेला उपकारक असल्याची बाब अल्पसंख्याक समुदायातील मतदारांसमोर प्रभावीपणे मांडण्याची आवश्यकताही यातून अधोरेखित झाली आहे, तर काँग्रेसपासून दलित समुदायही दुरावल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले असून, हा या पक्षासाठी धोक्याचा इशारा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेच्या नेतृत्वाला मात देणार्‍या नेत्याला काँग्रेस श्रेष्ठींनी पाठबळ देण्याची आवश्यकताही या निकालाने स्पष्ट केली आहे.

नेतृत्वाची हीच संभ्रमावस्था राष्ट्रवादी काँग्रेसला भेडसावत असल्याचे सिद्ध झाले आहे. या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भाजपसोबतची उघड सलगी अनेकदा टीकेचा विषय बनते. राष्ट्रवादीचे अनुयायी सोशल मीडियात याबाबत भरभरून व्यक्त होत असतात. मात्र, भाजप नेत्यांनी पवारांशी सलगी राखत त्यांच्याच पक्षाला धूळ चारण्याचे काम मोठ्या चतुराईने केले. एका अर्थाने फडणवीस यांनी पवार यांचीच खेळी त्यांच्यावर उलटवण्याची मुत्सद्देगिरी दाखवल्याचे आता उघड झाले आहे. यामुळे महापालिकांमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील पराभव हा अत्यंत जिव्हारी लागणारा आहे. या दोन्ही महापालिका अजित पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या होत्या. मात्र, भाजपने त्यांचे हे बालेकिल्ले उद्ध्वस्त करत जोरदार आगेकूच केली आहे. तथापि, पुणे, कोल्हापूर, सातारा आदींसारख्या जिल्हा परिषदांनी राष्ट्रवादीला थोडी उमेद दिली आहे. यातच धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यात चमकदार कामगिरी केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे बालेकिल्ले असणार्‍या पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपने दणदणीत यश संपादन केले आहे, तर आधीच या दोन्ही पक्षांच्या ताब्यात असणार्‍या सहकारी संस्थांना जेरीस आणण्याची कामगिरी चोखपणे पार पाडण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर नव्या उमेदीने राष्ट्रवादी काँग्रेसला रुजवण्याची जबाबदारी आता शरद पवार यांच्यावर आहे.
याचप्रमाणे या निवडणुकांमध्ये मनसेचा उडालेला धुव्वा राज ठाकरे यांना अस्वस्थ करणारा आहे. नाशिक महापालिकेतील सत्तेसह पुण्यात या पक्षाला आधी चांगले यश मिळाले होते. त्यांनी नाशिकमधील कामांचा गवगवादेखील मोठ्या प्रमाणात केला. निवडणुकीच्या कालखंडात त्यांनी आपल्या व्हिजनचे ‘प्रेझेंटेशन’ही केले. मात्र, याचा काहीएक उपयोग झाला नाही. यातच ‘टाळी’ देण्यावरून शिवसेनेने त्यांना अपमानित केले. मनसेची आक्रमकता आणि भावनात्मक राजकारण हे शिवसेनेने ‘हायजॅक’ केले, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे राजकीय चातुर्य देवेंद्र फडणवीसांनी चांगलेच आत्मसात केल्याचे या निकालांनी दाखवून दिले आहे. यामुळे येत्या कालखंडात याच दोन्ही पक्षांभोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचमुळे अवघ्या दोन वर्षांनी होणार्‍या लोकसभा आणि त्याच्या सहा महिन्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीला सज्ज राहण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेसारख्या पक्षांना तळागाळापासून संघटन मजबूत करावे लागणार आहे आणि अर्थातच या पराभवातून आलेले नैराश्य झटकून टाकत पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नवसंजीवनी प्रदान करावी लागणार आहे अन्यथा या निवडणुकीप्रमाणे भाजप व शिवसेनेत राजकीय धु्रवीकरणाचा ‘पॅटर्न’ पुढेदेखील यशस्वीपणे राबवला जाईल, असे स्पष्टपणे दिसून येत आहे.