मनसेचं पानिपत अन् भाजपचा परकायाप्रवेश!

0

मनसेची स्थापना झाली ती शिवसेनेच्या वारसदारासाठीच्या झगड्यातून! त्यांच्यामागे त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटणारे जसे उभे राहिले तसेच राम कदम, अवधूत वाघ यांसारखे भाजपेयींदेखील. पक्षस्थापनेनंतर झालेल्या 2009च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला लाख लाख मते मिळाली अन् शिवसेनेला मार खावा लागला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 13 आमदार निवडून आले. शिवसेनेला धक्का दिला गेला, महापालिका निवडणुकीत तर कमालच झाली. मनसेला नाशिकची सत्ता मिळतानाच कल्याण-डोंबिवली, मुंबई, ठाणे, पुणे इथे मजबूत असे संख्याबळ मिळाले. त्यामुळे एक नवी राजकीय शक्ती उभी राहिली, असं चित्र निर्माण झालं. या यशाने ते पार हुरळून गेले. आपणच सेनाप्रमुखांचे खरे राजकीय वारसदार, असं चित्र उभं करण्यात ते आणि त्याचे समर्थक यशस्वी ठरले. पण ती क्षणभंगुरता ठरली. त्यानंतरच्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकात मनसेचं अक्षरश: पानिपत झालं.

या मागचं राजकारण काही वेगळंच होतं, हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. शिवसेना आणि भाजप यांची युती ही प्रमोद महाजनांनी पुढाकार घेऊन केली होती. त्यांना शिवसेनाप्रमुख नव्हे, तर शिवसैनिक हवे होते. भाजपमधल्या अनेकांना त्यातही केवळ बहुजन समाजाचे आहेत म्हणून नेते बनले होते अशांना ही युती मान्य नव्हती. वामनराव परब, सूर्यभान वहाडणे, ना. स. फरांदे यांच्यापासून अगदी मधू चव्हाण व इतरांपर्यंत अनेकांनी याला विरोधही केला, पण महाजनांच्या पुढे कुणाचे काही चालले नाही. अशा युती विरोधकांची झालेली कोंडी मनसेच्या आगमनानेे दूर झाली. शिवसेनेला घरातूनच उभं ठाकलेलं आव्हान, पडलेली फूट, यामुळे शिवसेना संपवण्याचा विचार करणार्‍या संघ आणि भाजपेयींनी शिवसेनेला पर्याय मनसेला जवळ केलं. राज यांचे सहानुभूतीदार आणि शिवसेना विरोधक संघ स्वयंसेवक, भाजपेयी यांनी 2009आणि त्यानंतरच्या सर्व निवडणुकीत जिथे शिवसेनेचे उमेदवार होते तिथे उच्चवर्णीय भाजपेयी, संघ स्वयंसेवक यांनी मनसेच्या पारड्यात आपली मते टाकली. त्यामुळे मनसेला जिथे मोठे यश मिळाले हे लक्षपूर्वक पाहिले की ही कुटनीती लक्षात येते.

राज ठाकरे आणि मनसैनिकांना भाजपेयींची कुटनीती लक्षात जशी आली नाही तशीच ती हे बाळसं नसून सूज आहे हेही लक्षात आलं नाही, पाठोपाठ गडकरी, फडणवीस, तावडे यांच्यापासून अनेक भाजपेयी नेत्यांच्या राज यांच्या कृष्णकुंजवर राबता सुरू झाला. हे अनपेक्षित घडत गेल्याने राज व इतर आपल्याच तोर्‍यात वावरू लागले. त्यामुळे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाले. लोकसभा निवडणुकीत भाजपला ’नरेंद्रशक्ती’ प्राप्त झाली. ज्या मोदींचा स्वीकार आणि प्रचार राज ठाकरे यांनी केला त्यांची मग कोंडी झाली. मोदी लाटेत ती सारी मते वाहून गेली. परिस्थितीचं गांभीर्य त्यांना ओळखता आलंच नाही. विधानसभा निवडणुकीत 25 वर्षांची सेना भाजप युती तुटली. युती नको, शिवसेना नको म्हणून मनसेला जवळ करणार्‍या संघ स्वयंसेवकांना, त्यामुळे भाजपला मते देण्याचा मार्ग मोकळा झाला. ती मते पुन्हा भाजपकडे वळली. त्यामुळे विधानसभेत मनसेचा दारुण पराभव झाला. या पराभवातूनही मनसे काही शिकली नाही. सावरण्याची संधी मिळाली होती, पण आत्मघातकीपणाने ती घालवली. याचीच पुनरावृत्ती नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत झाली. मनसेचा सुपडासाफ झाला. या पानिपतात जे काही मोहरे निवडून आले आहेत तीच खरी मनसेची ताकद आहे हे ओळखून पुन्हा नव्याने पक्षबांधणी, मतपेढी तयार करायला हवी.

भाजपचा परकायाप्रवेश
मोदींच्या आणि अमित शहा यांच्या व्यूहरचनेनुसार भाजप आमूलाग्र बदलला. आपली शिस्तबद्ध, निष्ठावान, सेवाभावी, साधनसुचिता असणारा पक्ष अशी असलेली प्रतिमा त्याने झटकून टाकली. ’शेठजी-भटजी’ यांचा पक्ष म्हणून जी संभावना केली जात होती ती जाणीवपूर्वक बदलण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. काँग्रेसवाल्यानी हाताळलेले सर्व व्यवहारवादी राजकारण त्यांनी अंगीकारले. त्यानुसार सत्तेच्या माध्यमातून कोणताही विधिनिषेध न बाळगता सर्व पक्षातल्या गणंगांना त्यांनी भाजपची झुल चढविली. निवडून येण्याची क्षमता या एकमेव निकषांच्या आधारे आपल्या कार्यकर्त्यांशिवाय इतर पक्षांतील अनेकांना उमेदवारी दिली आणि आपली पक्की मतपेढी तयार करण्यासाठी विधानसभेपासून सुरुवात केली. नगरपालिका आणि महानगरपालिका यात हेच धोरण त्यांनी स्वीकारलं.

आजवर पक्षाच्या प्रचार यंत्रणेसाठी संघ स्वयंसेवकांवर अवलंबून राहावे लागत असे. असे हे परावलंबित्व झटकून टाकलं. आपल्या कार्यकर्त्यांचीच प्रचार यंत्रणा, संपर्कप्रणाली सज्ज केली. सत्तेबरोबरच साम, दाम, दंड, भेद याचा वापर करीत ग्रामीण भागात पक्षविस्तार आणि ग्रामीण सत्ता हस्तगत करण्यासाठी ते सरसावले. अरे ला कारे म्हणण्यासाठी गुंडांनाही पक्षप्रवेश दिला. आजवर सामूहिक नेतृत्व ही संकल्पना भाजपमध्ये राबवली जात असे, पण आता मोदींप्रमाणेच प्रत्येक राज्यात एक एक चेहरा तयार केला गेला आहे. तो मतदारांसमोर आणला.

आता भाजपचे रूप बदलू लागले आहे. सर्व सत्ताधीश बनल्याने आता त्यांच्याकडे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पैशाला तोटा राहिला नाही. पक्षाचे निष्ठावंत अजूनही प्रत्यक्ष राजकारणात येण्याऐवजी मागे राहूनच काम करण्यात धन्यता म्हणताहेत. सत्ताचाटण एकदा लाभलेलं असताना ते पुन्हा दूर जाणार नाही याची खबरदारी घेतली जातेय, त्यासाठी विकासाचा आभास निर्माण केला जातोय, त्याचं गारुड उभं करताहेत. अगदी थेट काँग्रेसच्या पावलावर पावलं टाकून वाटचाल सुरू झालीय जणू परकायाप्रवेश केल्याप्रमाणे!

महापालिका निवडणुकीत मतांचं दान कुणाच्या पदरात पडलं हे आता समजलंय. यात भाजपनं आपलं वर्चस्व दाखवलं. सन 2009 आणि 2012 मधल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपलं उपद्रवमूल्य आणि अस्तित्व अधोरेखित करणार्‍या मनसेचं 2014 आणि2017 च्या निवडणुकीत मात्र पानिपत झालं. यांचं विश्‍लेषण करताना अनेकांनी राज ठाकरे यांना जबाबदार धरलं. पण संघ आणि भाजपच्या कुटनीतकडे दुर्लक्ष केलं. आज मात्र भाजपला यश मिळवून दिलं असलं, तरी त्यांची ती कुटनीती मात्र यशस्वी झाली नाही शिवसेना संपली नाही उलट मजबूत झाली आणि मनसेही त्यांच्या कामामध्ये यशस्वी ठरली नाही, असंच म्हणावं लागेल.

– हरीश केंची 
9422310609