पुणे । राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शहर पोलिसांच्या वतीने या गावांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या गावांसाठी शहर पोलिसांच्या वतीने ही आचारसंहिता लागू करण्यात आली असून ग्रामीण भागातील गावांसाठी ग्रामीण पोलिसांच्या वतीने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. पोलिसांकडून देण्यात आलेले आदेश तसेच आचारसंहितेचा भंग करणार्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे.
कुरण बुद्रुकची निवडणूक 26 डिसेंबरला
आगामी वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणार्या पुणे जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याबाबतची आचारसंहिता 17 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली आहे. निवडणुकांचा निकाल जाहीर होइपर्यंत ही आचारसंहिता लागू असणार आहे. पुणे पोलिस आयुक्तांच्या अखत्यारीतील उत्तमनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुरण बुद्रुक गावची निवडणूक 26 डिसेंबरला होणार असून निकाल दुसर्या दिवशी जाहीर होणार आहे. त्याअनुषंगाने सहपोलिस आयुक्त रविंद्र कदम यांनी त्याबाबतच्या सूचना केल्या आहेत.