995 च्या ‘डीपी’मध्येही महापालिका रिंग रोड नाही

0

माहिती अधिकारात महत्वपूर्ण माहिती ‘घर बचाव संघर्ष समिती’च्या हाती

पिंपरी-चिंचवड : रिंग रोड बाधीत घर बचाव संघर्ष समितीने माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळविलेल्या माहितीमध्ये धक्कादायक माहिती हाती लागली आहे. 1995च्या विकास आराखड्याच्या नगररचना शासन राजपत्रित प्रतीमध्ये महापालिका आणि प्राधीकरण प्रशासनाकडे एचसीएमटीआर रिंगरोडचा समावेश अधोरेखित नाही. म्हणजेच स्थानिक प्रशासनच नगर रचना 1995 च्या विकास आराखडा नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे, विकास आराखड्यात रिंग रोडचा समावेश नसताना, त्याबाबतचा स्थानिक पातळीवर अट्टाहास का? असा मोठा प्रश्‍न ‘आरटीआय’मुळे उजेडात आला आहे. यामुळे त्वरित अवलोकन समितीची नेमणूक नगररचना विभागाने करणे आवश्यक आहे. त्यामध्ये बदल दर्शवीन हजारो घरे वाचू शकतील, रिंग रोडची 35 वर्षांपासूनची नागरिकांच्या डोक्यावरची टांगती तलवार निघून जाईल, अशी भावना शेकडो कुटूंबांची आहे.

सात महिन्यांपासून आंदोलन
गेले सात महिने शहरातील गुरुद्वारा रोड, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरातील हजारो रिंग रोड बाधित कुटुंबीय आपल्या हक्कांच्या घरासाठी विविध माध्यमातून आंदोलन करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी याबाबत प्राधिकरण आणि महापालिका या दोन्ही प्रशासनाकडे 1995 च्या विकास आराखड्याची नगररचना शासन राजपत्रित प्रत माहिती अधिकारान्वये मागवली होती. त्यानुसार प्राधिकरणाने जानेवारी केलेल्या खुलाशानुसार प्राधिकरणाच्या 1 ते 42 पेठांच्या विकासामध्ये एचसीएमटीआर रिंग रोडचा समावेश आढळला नाही.

पालिकेचा सहा पानी पुरवणी आराखडा
त्याचप्रमाणे महापालिकेच्या नगररचना व विकास विभागाचे उपअभियंता तथा माहिती अधिकारी सुनिल भगवानी यांनी 6 ़2018 रोजीच्या पत्रास खुलासा देत 20 पानी विकास आराखडा प्रत पाटील यांना टपालाद्वारे पाठवली आहे. त्यामध्ये 21 सप्टेंबर 1995 रोजीचा शहर विकास आराखडा तसेच 30 सप्टेंबर 1999 रोजीची पुरवणी आराखडा प्रत अशा दोन्ही प्रति देण्यात आल्या आहेत. 1999 पुरवणी आराखडा 3 पानी असून डॉ. एस. व्ही. जोशी शासन प्रधान सचिव यांच्या सहीने प्रसिद्ध झालेला आहे. त्याचप्रमाणे पुणे विभागाची क्रमांक 63 ते 79 अशी 17 पाने डी. टी. जोसेफ शासन सचिव यांच्या सहीने प्रसिद्ध झाले आहेत. या मध्येही 30 मीटर एचसीएमटीआर रिंग रोडचा समावेश अधोरेखित नाही. याचा अर्थ स्थानिक प्रशासनच नगर रचना 1995 च्या विकास आराखडा नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे, विकास आराखड्यात रिंग रोडचा समावेश नसताना, त्याबाबतचा स्थानिक पातळीवर अट्टाहास का? असा मोठा प्रश्‍न ‘आरटीआय’मुळे उजेडात आला आहे.

आराखड्यात पूर्ण स्पष्टता
21 सप्टेंबर 1995 नगररचना विभागाच्या विकास आराखडयानुसार बाऊंडेड ऑरेंज प्लॅन नुसार महापालिका हद्दीतील भोसरी, पिंपरी वाघेरे, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, वाकड या प्रमुख 10 उपनगरांचा समावेश आहे. यामध्ये अंतर्गत रस्ते, आरक्षणे याचा प्रामुख्याने समावेश आहे. यामध्ये पिंपळे सौदागरमधील 18 मी.चे तीन रस्ते, भोसरीमधील 12 मी. आणि 9 मी.चे 2 रस्ते, पिंपरीतील 18, 15, 12, 9 मीटरचे 14 रस्ते, चिंचवड हद्दीतील मुंबई-पुणे रोड ते चापेकर चौक असा 20 मी. रोड तसेच 18, 12 मीटरचे अन्य 4 रस्ते, आकुर्डी विभागातील खंडोबा माळ ते प्राधिकरण हद्द 9 आणि 12 मी रोड तसेच अन्य 7 डी पी रोड, सांगवी विभागातील 18, 12, 6 मी.चे 6 रोड. पिंपळे गुरव मधील 18 मीटरचा एक रोड, पिंपळे सौदागर मधील 20 मीटरचा रोड आणि 12 मीटरचे 3 रोड, पिंपळे निलख मधील 12 मीटरचा रोड, वाकड हद्दीतील 12 आणि 9 मीटरचे 2 रोड यांचा स्पष्ट उल्लेख आढळतो. परंतु, आकुर्डी गुरुद्वारा परिसर, वाल्हेकरवाडी-बिजलीनगर, चिंचवड थेरगाव पिंपळे गुरव हद्दीतुन जात असलेल्या प्रस्तावित 30 मी. एचसीएमटीआर रिंग रोड याचा स्पष्ट उल्लेख नाही.

प्राधिकरण आणि महापालिका या दोनही स्वायत्त संस्थानी 1995 च्या विकास आराखडयाचा आधार कोणत्या नियमानुसार घेतला आहे याचा स्पष्ट जाहीर खुलासा करावा.नगर रचना विभागाने 1995 च्या विकास आराखडयात एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड चा समावेश केलेला दिसून येत नाही प्राधिकरण आणि पालिका या दोनही संस्थानी माहिती अधिकारात दिलेल्या कागदपत्रांद्वारे सदरची महत्वपूर्ण बाब निदर्शनास आलेली आहे.विकास आराखड्याची मुदत 2015 मध्ये संपुष्टात आलेली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे तसेच लोकसंख्येमुळे फेर सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.
-विजय पाटील, मुख्य समन्वयक, घर बचाव संघर्ष समिती