विमा योजना आचारसंहितेत अडकली

0

महापालिका प्रशासनास नूतनीकरण कराराचा विसर
पुणे : पंडीत दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना शहरातील प्रामाणिक करदात्यांसाठी 2018-19 पासून सुरू करण्यात आलेली होती. हि योेेेजना आचारसंहितेत अडकली आहे. ही योजना 28 फेब्रुवारी 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीसाठी होती. त्यामुळे ज्या कंपनीस हे अपघात विम्याचे काम देण्यात आले आहे, त्या कंपनीच्या कराराचे नूतनीकरण करण्याचा विसर पालिका प्रशासनाला पडल्याने ही योजना आता लोकसभा निवडणुकीनंतरच नव्याने लागू होणार आहे. महापालिकेकडून 2017-18 च्या अंदाजपत्रकात प्रस्तावित या योजनेची अंमलबजावणी 2018-19 पासून सुरू करण्यात आली.

संपूर्ण कुटुंबासाठी योजना लागू

महापालिकेने या योजनेचा न्यू इंडिया इन्शुरन्स विमा कंपनीशी करार केला होता. यानुसार दि.31 मार्च 2019 पर्यंतच ही योजना लागू राहणार होती. तर 2019-20 च्या अंदाजपत्रकात या योजनेत बदल करण्यात आला असून आता संपूर्ण कुटुंबासाठीच ही योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या नवीन बदलानुसार, निविदा मागविल्या होत्या. मात्र, त्याला पुन्हा एकाच कंपनीने प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पुन्हा स्पर्धा व्हावी, यासाठी निविदा मागविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असतानाच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे प्रशासनास आता निविदा प्रक्रिया पूर्ण करून नव्याने करार करायचा असल्यास जून 2019 उजाडणार आहे. त्यामुळे दि.31 मार्चनंतर या योजनेस पात्र असलेल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे अशा योजनांसाठी होणार्‍या निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.