एका भूमिपुत्राची गोष्ट
राजपत्रित अधिकार्याच्या नोकरीवर पाणी सोडले. आईच्या संमतीने आणि सल्ल्याने केवळ सात हजार रूपयांच्या भांडवलावर एजन्सी घेऊन घरोघरी जात हातगाडीवर केरोसिनची विक्री केली. पुढे जाऊन देश — विदेशातील शेती आणि शेतकर्यांसाठी संजीवनी ठरणार्या जैन उद्योग समूहाची स्थापना केली, त्या भवरलाल हिरालाल जैन ऊर्फ मोठे भाऊ यांची आज पुण्यतिथी.
हेनरी फोर्ड, काईचिरो टोयोटापासून ते लक्ष्मणराव किर्लोस्कर,विष्णु रामचंद्र वेलणकर,चितळे तसेच अमेरीका, रशिया, युरोप अशा देश, विदेशातील अनेक यशस्वी, दानशूर, विचारवंत उद्योजकांच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतील, पण आज मी आपल्याला आपल्या खान्देशच्या मातीतल्या आणि जगभरात ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा शेती — शेतकर्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळे यशस्वी प्रयोग केले अशा एका भूमिपुत्राची गोष्ट सांगणार आहे. ज्यांचं मूळ राजस्थानमधील आगोलाई आहे. वारंवारच्या दुष्काळी परिस्थितीला कंटाळून शंभर वर्षांपूर्वी पुर्वजांनी अजिंठा पायथ्याशी असलेल्या जामनेर तालुक्यातील वाकोद या छोट्या खेडेगावात स्थलांतर केले. याच छोट्याशा गावात देश स्वतंत्र होण्यापुर्वी म्हणजे 12 डिसेंबर 1937 मध्ये झाला. याच लहान गावात त्यांचं चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. नंतर जळगावातील आर.आर. विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते मुंबईला आपल्या काकांकडे राहू लागले. तेथे त्यांनी बीकॉम, एलएलबी म्हणजे वकिलीचे शिक्षण घेतले. मोठ्या पदावर नोकरी करायची म्हणून राजपत्रित अधिकारी पदाची तयारी सुरू केली, परीक्षाही दिल्या. मुळात कुशाग्र बुध्दी. अभ्यास, वाचन, चिंतन, मनन आणि लेखन करण्याची आवड असल्यामुळे ते परीक्षाही पास झाले आणि त्यांची निवड थेट राजपत्रित अधिकारी म्हणून महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत झाली. सेवेत रुजू होण्यापुर्वी आईचा सल्ला घेण्यासाठी ते आपल्या वाकोद या गावी आले. आईने त्यांना सरकारी नोकरीत रूजू न होता. आपल्या गावात,शहरात, जिल्ह्यात शेती, शेतकरी आणि पशू-पक्षी याच्याशी संबंधीत व्यवसाय करत लोकसेवेचा आणि उध्दाराचा सल्ला दिला. आईचे संस्कार आणि सल्ला त्यांना मोलाचा वाटला. अथक परिश्रमातून मिळवलेली बड्या अधिकारी पदाच्या नोकरीवर त्यांना पाणी सोडावे लागले. तथापि, आयुष्यात सगळेच अपघात वाईट असतात असं नाही. दृष्टीत दोष असू शकतो दृष्टीकोनात नाही. त्यामुळे अजिबात नाउमेद न होता, न खचता त्यांनी केवळ सात हजार रूपयांच्या भांडवलावर केरोसीनची एजन्सी बुक केली. हातगाडीवरून घरोघरी जाऊन केरोसिनची विक्रीही सुरू केली. हा व्यवसाय करत असताना त्यांना निकृष्ठ बियाणे, पाणी, खतांची कमतरता यांसारख्या शेतकर्यांच्या प्रश्नांची त्यांना तीव्रतेने जाणीव होऊ लागली. हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी शेतकर्यांना उच्च प्रतीची साधन,सामग्री पुरवण्याचा व्यवसाय करण्याचे निश्चित केले. हळूहळू शेतकर्यांना सामग्री मिळू लागली. त्यांचा व्यवसायही वाढला. साहित्य बाहेरून आणून विक्री करण्यापेक्षा उपकरणे तयार करण्याचा निर्धार केला. क्रुड ऑइल, बियाणे, खते, ट्रॅक्टर्स, सिंचनासाठी लागणारे प्लास्टिक पाइप्स आदी साहित्यांचे उत्पादन सुरू केले. जळगाव हा केळी, पपई पिकवणारा प्रदेश असल्यामुळे त्यांची शोधकवृत्ती तिकडे वळली. मग काय, केळीची भुकटी तयार करणारा एक बंद पडणारा सहकारी कारखाना विकत घेतला. त्या यंत्राचा उपयोग करून पपईच्या चिकापासून पेपेनचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. पीव्हीसी पाइप्सला सक्षम पर्याय आणि शेतकर्यांच्या खर्चात बचत करणारा पीव्हीसी पाइप निर्मितीचा कारखाना सुरू केला. 1980 चा तो काळ होता. हाच कारखाना पुढे जाऊन आज देशभरात अत्याधुनिक ठिबक सिंचनाची नांदी ठरला आहे. ठिबक सिंचनानंतर शेतकर्यांसाठी त्यांनी जैव तंत्रज्ञानाशी संबंधित प्रयोगशाळा उभारली. केळी रोपांचे ऊती संवर्धन केले. डाळिंब व कांद्याच्या रोपांच्या ऊती संवर्धनाची संकल्पना मांडली आणि रुजवली. केळीच्या कापणी हंगामाचा कालावधी 18 महिन्यांवरून 11 महिन्यांवर आणला. उत्पादन वाढीबरोबर शेतकर्यांचा पैसा वाचला. प्रगती आणि विकासाचे एक, एक दालन उघडत असताना, आपल्या मातीत रूजलेली वाढलेली जिन्न्स सातसमुद्रापार जाऊ लागली. यावर समाधान न मानता, या आपल्या भूमिपुत्राने जळगावातच अन्न प्रक्रिया उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. भाजीपाला, कांदा, लसूण, आले आदींचे निर्जलीकरण करण्यात यश मिळवले. देशातील जळगाव, वडोदरा तर अमेरिकेत बोर्डमॅन व ब्रिटनमध्ये सिलफोर्ड येथे त्यांचे कारखाने उभे राहिले. यामुळे कांद्यासारख्या सडणार्या पिकाला त्यांनी बाजारभावाची हमी मिळवून दिली. कांदा पिकासाठी करार शेतीची संकल्पना रुजवली. हे प्रयोग यशस्वी होत नाही, तोच त्यांनी फळांवर प्रक्रिया करणारा उद्योगही सुरू केला. या प्रकल्पातून आंबा, केळी, पेरू, डाळिंब, पपई, आवळा, टोमॅटो या फळांवर प्रक्रिया करून त्याचे पल्प व प्युरी तयारी होऊ लागली आहे. केवल उद्योग व्यवसाय न वाढवता त्यांनी शेतकर्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान पाहण्याचे व शिकण्याचे केंद्र सुरू केले. ज्याचा लाभ केवळ आपल्या जिल्ह्यातीलच नाही तर वेगवेगळ्या प्रांतातील लोकही घेत आहेत. उद्योग, व्यवसायासोबत या भूमिपुत्राने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातही काम कर आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. गांधी विचारांचे पाईक असल्यामुळे त्यांनी आपल्या उद्योग समूहाच्या परिसरातच दोन लाख चौरस फूट जागेवर गांधी तीर्थची उभारणी केली. त्यात गांधीजींनी लिहिलेली मूळ पत्रे, ग्रंथसंपदा, त्यांच्यावर इतरांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या मूळ प्रती, हजारो पुस्तकांचा संग्रह, छायाचित्रे, चलचित्रे, म. गांधीजींची भाषणे, लाखोंच्या संख्येने मूळ कागदपत्रे, फैजपूर येथे झालेल्या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी वापरलेल्या वस्तू यांचा संग्रह त्यांनी उभारला. उद्योजक म्हणून जगभरात ओळख निर्माण झालेल्या भूमिपुत्राला लोक विचारवंत, लेखक म्हणूनही ओळखतात. त्यांनी अनेक वाचनीय पुस्तके लिहिली आहेत. ती व मी, हे पत्नीवर लिहिलेले पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. निसर्गकवी ना. धों. महानोर हे त्यांचे जीवलग मित्र. होते. देशाच्या राजकारणातील बडे नेते शरद पवार यांच्याबरोबरही त्यांचे स्नेहाचे संबंध होते. एवढेच नाही सर्वच पक्षातील अनेक नेत्यांशी त्यांची मैत्री होती. आधुनिक आश्रमशाळा वाटावी आणि शिक्षणासोबत संस्काराचे धडे गिरवता यावेत म्हणून अनुभूतीसारखी इंग्रजी माध्यमाची शाळा काढली आणि गरीब कुटूंबातील होतकरू, अभ्यासू मुलांना दर्जेदार शिक्षणाची वाट करून दिली. असे हे भुमिपुत्र म्हणजे ज्यांना देशातल्या सर्वेच्च समजल्या जाणार्या पुरस्कारांमधील सन्माचा पदमश्री देऊन गौरविण्यात आले आहे, ते म्हणजे आपले भवरलाल हिरालाल जैन होय. ज्यांना त्यांच्या मातोश्री गौराबाई यांनी घडवले. त्या मातेलाही सलाम. ही गोष्टही म्हणजे आपल्याला उद्योगगाथा किंवा यशोगाथा वाटत असली तरी हा एका सहहदयी,संवेदनशील,विचारवंत, निरंतर प्रयोगशिल,काळाची पाऊले ओळखण्याची हातोटी, यासोबतच जिद्द,चिकाटी,परिश्रम या गुणांच्या जोरावर आणि विज्ञानाच्या मदतीने ज्यांनी सामान्य शेतकर्यांचं आयुष्य सोपं आणि सुखकर त्यांचा हा अत्यंत प्रेरक असा प्रवास आहे, हे मात्र तेवढेच सत्य आहे.
त्र्यंबक कापडे
संपादक, दैनिक जनशक्ती