लोकलच्या देखभालीसाठी भिवपुरी, वामगावमध्ये कारशेड उभारणार

मुंबई | मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी प्रत्येकी तीन कारशेड आहेत. या कारशेडवरील कामाचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी आणि भविष्यात वाढणारी नव्या लोकलची संख्या लक्षात घेऊन मुंबई रेल्वे विकास काॅर्पोरेशनने (एमआरव्हीसी) मध्य रेल्वेवरील कर्जतजवळील भिवपुरी आणि पश्चिम रेल्वेवरील डहाणूजवळील वाणगाव येथे कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कारशेडसाठी आवश्यक असलेल्या जमिनीसाठी ‘एमआरव्हीसी’ने भूसंपादनाच्या कामाला गती दिली असून, या कारशेडमुळे भविष्यात १२० लोकलच्या देखभाल, दुरुस्तीचा प्रश्न सुटणार आहे.

‘एमआरव्हीसी’च्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी ३ ए) दोन कारशेड उभारण्याचा निर्णय २०१९ मध्ये घेण्यात आला होता. या कामासाठी २,३५३ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. भिवपुरी येथे ५५ हेक्टर आणि वाणगाव येथे ३५ हेक्टर जागेवर कारशेड उभारण्यात येणार आहे. कारशेडसाठी आवश्यक जागेच्या भूसंपादनाला सुरुवात झाल्याची माहिती ‘एमआरव्हीसी’च्या अधिकाऱ्यांनी दिली. या दोन कारशेडमध्ये प्रत्येकी ६० लोकलची एकाच वेळी देखभाल, दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. भूसंपादनंतर दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक कारशेड उभारण्यासाठी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.