पितृ दिनानिमित्त बाप विषयक कवितांची मैफल; चोपडा मसाप व रोटरी क्लबतर्फे आयोजन 

चोपडा (प्रतिनिधी)

बाप घराचं धोरण असतो…., बाप रस्त्यालगतचा पळस…, बाप जन्मभराची शिदोरी… , बाप संयमाचा पाट…., बाप खेळातला घोडा…. अशा विविध उपमा आणि प्रतिमांनी प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा असलेल्या पण तरीही साहित्यात उपेक्षित असलेल्या बापाचे अंतरंग उलगडून बाप समजून घेण्याचा प्रयत्न झाला आणि साऱ्या उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या…निमित्त होते जागतिक पितृ दिनाचे!

जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक पितृ दिनानिमित्त येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेची चोपडा शाखा व रोटरी क्लब चोपडा तर्फे ‘शब्द पूजा जन्मदात्याची’ हा बाप विषयक कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम नगर वाचन मंदिरात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ कवी अशोक नीलकंठ सोनवणे हे होते. तर मंचावर कार्याध्यक्ष विलास पाटील-खेडीभोकरीकर, प्रमुख कार्यवाह संजय बारी तसेच रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष रोटे. ॲड. रुपेश पाटील, प्रकल्प प्रमुख रोटे. सागर नेवे हे उपस्थित होते.

जन्मदात्याची शब्द पूजा बांधताना सौ. योगिता पाटील, तुषार लोहार, डॉ. किशोर पाठक,  सौ. संगीता बोरसे, शां. हि. पाटील, जगदीश पाठक, प्रसाद वैद्य, विलास पाटील-खेडीभोकरीकर, गणेश पाठक, शैलेंद्र महाले, पंकज शिंदे व संजय बारी यांनी यावेळी स्वरचित तसेच संकलित केलेल्या बाप विषयक कविता सादर करुन श्रोत्यांची दाद मिळवली. भगवान पाटील यांनी बापाविषयी विचार मांडले. अध्यक्षीय मनोगतात अशोक सोनवणे यांनी ‘टांगलेला बाप’ ही स्वरचित कविता सादर करुन बाप घराचे धोरण असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी, प्रास्ताविक ॲड. रुपेश पाटील यांनी व आभार प्रदर्शन सागर नेवे यांनी केले. यावेळी बाप विषयक कवितांच्या खानदेशस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सौ. योगिता पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शहरातील अनेक रसिक श्रोते उपस्थित होते.