शहादा :- मा. आमदार राजेश पाडवी यांनी शहादा व तळोदा नगर परिषद हद्दीतील लोकांसाठी स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत त्यांचे पत्र क्र.जा.क्रSHD/ २०२२-२३/७४० दिनांक १९/१२/२०२२ अन्वये न.पा शहादासाठी ७ कोटी रु. व. न.पा तळोदासाठी ३ कोटी रु. असे एकूण १० कोटी रुपयांचे विविध कामांचे मागणी पत्र मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर केले होते. सदर मागणी पत्रानुसार नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णय क्रमांक-नपावै २०२२/प्र.क्र.२३६ (१२९) नवी १६ दिनांक २७ डिसेंबर २०२२ नुसार एकूण १० कोटी रुपयांचा निधीला मंजुरी प्राप्त झाली. त्यानुसार न.पा शहादा यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्या कडून प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर व तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण केली. व त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण केलेल्या संबंधित यशस्वी ठेकेदारांना कार्यारंभ करण्याचे आदेश देण्यात आले. सदर कामांचे भूमी पूजन दिनांक ५/६/२०२३ रोजी मा. आमदार राजेश पाडवी, श्री. राजेद्रकुमार गावित मकरंद पाटील, विनोद जैन, डॉ. किशोर पाटील, मयूर पाटील, शहराचे सर्व भाजप चे पदाधिकारी व त्या-त्या परिसरातील सर्व सामान्य नागरिक यांच्या उपस्थितीत भूमी पूजन संपन्न झाले. व रस्त्यांचा कामाला सुरुवात करण्यात •आली. मान्सूनच्या आगमनाची तयारी बघता नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मा. आमदार राजेश पाडवी यांचा सदर कामे मान्सूनपूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यानुसार संबंधित ठेकेदारांनी कामांना जोमात सुरुवात केली आहे..
परंतु एकदा भूमी पूजन झालेल्या कामांना पुन्हा मा. पालकमंत्र्यांचा हस्ते भूमी पूजन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सुरु झालेले रस्त्यांची कामे ठेकेदाराने बंद केल्यामुळे नागरिकांनी विचारणा केली असता मा. पालकमंत्र्यांनी भूमी पूजन केल्यानंतरच सदर कामे पुन्हा सुरु करण्यात येतील असे समजले. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये यामध्ये चर्चा असून न.पा. अधिकाऱ्यांना सुद्धा विचारणा केली असता त्यांनी होकार दिला आहे. येणाऱ्या न.पा. च्या निवडणुका लक्षात घेता केवळ श्रेयवादासाठी सर्व सामान्य नागरिकांना पालकमंत्र्यांनी वेठीस धरले आहे. या पूर्वी सुद्धा आमदार राजेश पाडवी यांनी शहादा शहरासाठी २५ कोटी रुपयांची मंजुरी आणून ती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यावेळी मा. पालकमंत्र्यांना कामांच्या भूमी पूजनाची किंवा शहादा शहरांच्या नागरिकांची आठवण का झाली नाही? त्याबाबत शहरात सर्वत्र चर्चा आहे. याशिवाय मा. आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सन २०२२-२३ करिता विविध कामांची मागणी केली होती. परंतु पालकमंत्र्यांनी त्यांच्या कामांना अक्षता दाखविण्यात आल्याचे समजते..!