पुणे – दौंड तालुक्यातील भांडगाव येथे भांडगाव-खोर मार्गावर असलेल्या मीनाक्षी फायरी इनगार्ड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आज आग लागली. सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान स्क्रॅप लोखंड असलेल्या साठ्याला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीदरम्यान दोन ते तीन स्फोट झाले. या आगीत जिवीतहानी झाली नसली तरी २ ते ३ परप्रांतीय कामगार जखमी झाले आहेत.
या स्फोटाचा आवाज एक किलोमीटर अंतरापर्यंत गेल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. यापूर्वीही या कंपनीमध्ये (३१ जानेवारी) रोजी भीषण स्फोट होऊन ३ परप्रांतीय कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता, तर ७ परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर औद्योगिक सुरक्षा विभागाने कंपनीच्या मालकावर व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करीत कंपनी बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु कंपनी प्रशासनाने हे आदेश झुगारत पुन्हा मीनाक्षी कंपनी सुरू केली आहे.
तीन महिन्यांपूर्वीची घटना ताजी असतानाच आजच्या या घटनेने मीनाक्षी कंपनीतील परप्रांतीय कामगारांचा व गावालगत असलेल्या कंपनीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कंपनीविषयी स्थानिक ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक वेळा तक्रारी करून देखील याची दखल घेतली गेली नाही.
औद्योगिक सुरक्षा विभागाने कंपनी विरोधात खटला दाखल करून कंपनी बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र मुजोर कंपनी मालक व प्रशासनाने त्याला दाद न देता कंपनी सुरूच ठेवली. त्यामुळे कंपनीतील परप्रांतीय कामगारांचा व येथील ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान भांडगाव ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्याच आठवड्यात कंपनीला लेखी पत्रव्यवहार करून कंपनी सुरू केल्याबाबत खुलासा मागविला असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.