तरुणांमध्ये कोरोनाबाबत गांभीर्यच नाही; व्हिडिओ पाहून येईल राग

0

चेन्नई: जगभरात कोरोनाने कहर माजविला आहे. दररोज देशात ८० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४१ लाखांच्या पुढे गेली आहे. शनिवारी एकाच दिवशी तब्बल ९० हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आहे. धडकी भरविणारी आकडेवारी दररोज समोर येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. नागरिकांमध्ये जनजागृती देखील केली जात आहे. मात्र तरुणांमध्ये कोरोनाबाबत गांभीर्य नसल्याचे वारंवार दिसून येत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, मात्र चित्र उलटेच आहे, तरुणांकडून संसर्ग रोखण्यापेक्षा संसर्ग वाढेल अशीच कृत्ये केली जात आहे. एएनआय या वृत्त संस्थेने एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यात तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात शेकडो तरुण एका मैदानात जमा होऊन क्रिकेट खेळतांना दिसत आहे. रविवारचा दिवस असल्याने शेकडो तरुण खेळण्यासाठी मैदानात आले, मात्र गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढेल याचा भान तरुणांना राहिलेले नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राग देखील व्यक्त होत आहे. कोरोनाच्या काळात गर्दी करणे योग्य नाही, मात्र तरुणांकडून सूचनांचे पालन होतांना दिसत नाही.

तामिळनाडू राज्यात साडेचार लाख कोरोनाबाधित आढळून आले आहेत. संख्या अधिक असतांना काळजी घेणे आवश्यक आहे.