नवी दिली: दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात बुधवारी आयोजीत पत्रकारपरिषदेत येत भाजपचा एका समर्थकाने अचानक घोषणाबाजी केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या अजयसिंह बिष्ट या मुळ नावाने संबोधल्याबद्दल आक्षेप घेत त्याने घोषणाबाजी केली. यावेळी त्याने हातात तिरंगा धरत ‘भारत माता की जय, वंदे मातरम’चे नारे दिल्यामुळे काही क्षण गोंधळाचे वातावरण झाले होते. नचिकेता वाल्हेकर असे भाजप समर्थकाचे नाव आहे.
काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी रायबरेलीत काँग्रेस आमदार आदिती सिंह यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या मुद्यावर पत्रकारपरिषद बोलावली होती. यादरम्यान त्यांनी योगी आदित्यानाथ यांना त्यांच्या अजयसिंह बिष्ट या मुळ नावाने संबोधले. यावर नचिकेता वाल्हेकर याने आक्षेप घेतला. आदित्यनाथ यांना अजय सिंह बिष्ट असे संबोधने म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे, असे म्हणत त्याने हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित सर्वजणच काही क्षणासाठी गोंधळले. पत्रकारपरिषदही काही मिनीटांसाठी थांबली होती. यानंतर लगेचच त्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरून बाहेर काढले व नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.