नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी मोर्चा

0

रावेर: परतीच्या पावसाने रावेर तालुक्यात झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत करावी या मागणीसाठी शुक्रवर, 8 नोव्हेंबर रोजी फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयावर रावेर व यावल तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. हा निर्णय आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शेतकरी व शेतमजुरांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीकोनातून त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याची तयारी यावेळी शिरीष चौधरी यांनी दर्शविली. त्यासाठी आंदोलनाची दिशा येत्या आठवडाभरात ठरविण्यात येणार असल्यची माहिती चौधरी यांनी दिली.

कापसाचे पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी

रावेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. नुकसानीचे पंचनामे शासनातर्फे करण्यात येत असून त्यात कापसाचे पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी या बैठकीत मांडल्या. सरसकट पंचनामे करून शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली. माजी आमदार हरीभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पंचनामे न करता उतार्‍यावर नोंद असलेल्या पीक पेर्‍यानुसार मदत करावी, अशी माहिती रमेश पाटील यांनी दिली. शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावरील पीक पेर्‍यानुसार हेक्टरी 50 हजाराची मदत मिळावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

मदत जाहीर करा-माजी आ.पाटील

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात मिळाल्याशिवाय तो पुन्हा उभे राहणे कठीण आहे. पंचनामे नकोच, अनेक ठिकाणी चुकीचे पीक पेरे असल्याने ते तत्काळ दुरुस्त करण्यात यावे, मदत न मिळाल्यास ठिकठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल, असे माजी आमदार अरुण पाटील यांनी बैठकीत सांगितले. ते म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळाली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. शेतकर्‍यांची वीज बिल व शैक्षणिक फी माफ करावी. शेतकर्‍यांसाठी मदत म्हणून स्वतंत्र प्याकेज द्यावे, पंचनामे करण्यासाठी बांधावर जाण्यापेक्षा सरसकट पंचनामे करावे, ओला दुष्काळ जाहीर करून रब्बी हंगामाच्या तयारीसाठी तरी आर्थिक मदत मिळावी, केळी फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष पूर्ववत करुन याला मुदतवाढ मिळावी, अति पावसाचा हळद पिकांवर मोठा परीणाम झाला असून यामुळे कंद सडत असल्याने उत्पादनात निम्म्याने घट येणार आहे.पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने जाहीर केलेल्या हमीभावात वाढ करून द्यावी तलाठ्यांनी पीक पेरे नोंद केलेले नाही, नुकसानीपोटी हेक्टरी 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली.

यांची होती उपस्थिती

बैठकीस माजी आमदार अरुण पाटील, मसाकाचे उपाध्यक्ष भागवत पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गनवाणी, रमेश महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ.राजेंद्र पाटील, डी.सी.पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, एस.आर.चौधरी, प्रल्हाद बोंडे, आर.के.चौधरी, सुनील कोंडे, चिमण धांडे, गंपा चौधरी, किशोर पाटील, वाय.व्ही.पाटील, ईस्माईल तडवी, हृदयेश पाटील, चांगो भालेराव, सुरेश पाटील, प्रकाश पाटील, जिजाबराव चौधरी, बी.यु.पाटील, यशवंत धनके, दिताराम महाजन, लक्ष्मण मोपारी, राजू सवर्णे, योगेश गजरे, खरेदी-विक्री संघाचे सचिव विनोद चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव गोपाल महाजन प्रवीण पाटील उपस्थित होते.