ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे एक वर्षीय बालकाचा गेला जिव
इच्छापूर - निमखेडी येथील दुर्दैवी घटना ठेकेदारा विरोधात संताप - प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ?
मुक्ताईनगर |
तालुक्यातील इच्छापूर – निमखेडी ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम सुरू आहे . या ग्रामपंचायतीच्या शौचालय बांधकामासाठी आठ ते दहा दिवसांपासून शौचालयाच्या सेफ्टी टाकीचे बांधकाम करून त्यात पाणी टाकण्यात आले आहे . मात्र, ठेकेदाराने शौचालयाच्या उघड्या टाकीवर झाकण ठेवले नसल्याने त्यात शेजारीच राहणारा बालक नयन पवन बेलदार (वय १ वर्षे )या बालकाचा शौचालयाच्या टाकीतील पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. २९ रोजी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी घडली. तर या घटने प्रकरणी मयत नयनचे वडील पवन तुळशिराम बेलदार रा.इच्छापूर यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेच्या ठिकाणी पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मयत नयन या बालकाच्या नातेवाईकांनी ठेकेदारा विरोधात तिव्र संताप व्यक्त केला असून निष्क्रीयपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी होत आहे . तर या घटनेचा पुढील तपास पो.हे.कॉ. श्रावण जवरे करीत आहेत .
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न ?
मयत नयन याच्या मृत्युस कारणीभुत ठरलेले ठेकेदार भास्कर लंवाडे यांनी मयताच्या नातेवाईकांना काही रक्कम देवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे . तसेच संबधीत ठेकेदार याचे राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी संबध असल्याने त्यांच्याकडुनही या ठेकेदाराची पाठराखण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात असुन नित्कृष्ठ दर्जाचे बांधकाम होत असलेल्या या कामाची वरीष्ठ अधिकार्यांनी निपक्षपणे चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अन्यथा भविष्यात बांधकाम होत असलेल्या नित्कृष्ठ दर्जाच्या इमारतीमुळे नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो अशी सुज्ञ नागरीकांमधून मागणी होत आहे .
सामंजस्याची भुमिका घेतली
गावात घडलेली घटना दुर्देवी आहे . यामध्ये ठेकेदाराचा दोष नसुन बांधकामासाठी शौचालयाच्या टाकीत साठवलेल्या पाण्याचा वापर केला जात आहे. लहान बालक खेळता खेळता नजर चुकीने त्यामध्ये पडले.यामुळे या घटनेत कुणाचा दोष असेल असे वाटत नसुन काही ग्रामस्थांनी घटनेबाबत सामंजस्याची भुमिका घेतली असल्याचे सरपंच गणेश थेटे यांनी सांगितले .