मुंबई : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे पडघम लवकरच वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षाकडून मर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, महाविकास आघीडीत जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे नेते आणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठं विधान केलं आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, भंडारा, गोंदिया येथे प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात काम करतोय. आम्ही सर्वच मतदारसंघात चाचपणी करतोय की कोणत्या मतदारसंघात राष्ट्रवादीने लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवावी. विदर्भात चाचपणी सुरू असून मित्रपक्षाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. जी जागा राष्ट्रवादीला अनुकूल आहे. त्या जागेबाबत मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. वर्धा आमच्यासाठी अनुकूल आहे. परंतु, महाविकास आघाडीतील इतर मित्रपक्षांनाही विचारात घेतले जाणार आहे. ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार आहे तिथे तो उमेदवार दिला जाईल.
प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात पक्षसंघटना उभी राहायला हवी याकरता आमची तयारी सुरू आहे. तसंच, कोणते विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला अनुकूल राहतील याची चाचपणी सुरू झाली आहे. चाचपणी झाल्यानंतर मित्रपक्षांशी चर्चा करून पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी निर्णय घेतील, असं अनिल देशमुख म्हणाले.