शिंदखेडा रेल्वे स्थानकावर अति जलद रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी शिंदखेडा तालुका भाजपा प्रवासी आघाडी तर्फे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन
भाजपच्या कार्यकर्त्यांनी दानवे यांची शिंदखेडा रेल्वे स्थानकावर घेतली भेट.
शिंदखेडा (प्रतिनिधी) शहर व परिसरातील अनेक नागरिक, विद्यार्थी, व्यापारी पुणे येथे जात असतात. शिंदखेडा येथून पुणे येथे जाण्यासाठी बस व ट्रॅव्हल्स हाच पर्याय आहे. पुणे येथे जाण्यासाठी शिंदखेडा दोंडाईचा नंदुरबार या मार्गाने भुसावळ पुणे रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी शिंदखेडा तालुका भाजप प्रवासी आघाडीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. मंत्री श्री. दानवे हे जळगावहून सुरत येथे रेल्वेने शासकीय कामासाठी जात असताना त्यांची रेल्वे शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आली. त्यावेळी हे निवेदन देण्यात आले. शिंदखेडा तालुका भाजप प्रवासी आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून श्री. दानवे यांनी काही मिनिटे रेल्वे शिंदखेडा रेल्वे स्टेशनवर थांबविली व कार्यकर्त्यांची भेट घेऊन पुणे रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले. शिंदखेडा रेल्वे स्थानकावर विविध सुपरफास्ट रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
शिंदखेडा रेल्वे स्थानक हे सुरत भुसावळ मार्गावरील मुख्य रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर थांबा असलेल्या रेल्वेने तालुक्यातीलच नव्हे तर शिरपूर, धुळे, सोनगीर या परिसरातील प्रवासी देखील मोठ्या संख्येने प्रवास करतात. या परिसरातील अनेक व्यापारी आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई आणि पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये प्रवास करतात. काही प्रमाणात जलद गाड्यांना शिंदखेडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळाल्याने मुंबईकडे रेल्वेने प्रवास करण्याची अडचण कमी झाली आहे. मात्र पुण्याकडे जाण्यासाठी बसेस किंवा ट्रॅव्हल्स याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे पुणे येथे जाण्यासाठी दोंडाईचा, नंदुरबार नवापूर भेस्तान व्हाया वसई रोड कल्याण कर्जत लोणावळा पुणे अशी प्रवाशी रेल्वे सुरू करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिंदखेडा शहर व परिसरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना मुंबई येथे जाण्यासाठी सुरत मार्गे कमी वेळ लागतो. त्यासाठी शिंदखेडा रेल्वे स्थानकावर पुरी अहमदाबाद (१२८४३/१२८४४), प्रेरणा एक्सप्रेस (२२१३७ / २२१३८), भागलपूर सूरत एक्सप्रेस (२२९४७/२२९४८), बरोनी अहमदाबाद एक्सप्रेस (१९४८३/१९४८४), अहमदाबाद साप्ताहिक एक्सप्रेस (१९४३५ / ९९४३६), हिंसार एक्सप्रेस (२२७३७/२२७३८), बांद्रा पटणा एक्सप्रेस (२२९७१- २२९७२), उधना बनारस एक्सप्रेस(२२९२९-२२९३०) या अति जलद गाड्यांना देखील शिंदखेडा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
शिंदखेडा रेल्वे स्थानकावर अति जलद गाड्यांना थांबा मिळाल्यास व पुणे येथे जाण्यासाठी या मार्गावर रेल्वे सुरू झाल्यास व्यापारी व विद्यार्थी यांच्या वेळ व पैसा वाचेल व रेल्वेच्या उत्पन्नात देखील वाढ होईल.
अमरावती सुरत एक्सप्रेस गाडी क्र.२०९२५-२०९२६ ही गाडी नियमित सुरु करावी. नंदुरबार पॅसेंजर गाडी क्र. ०९०७७/०९०७८ हि गाडी सुरत स्टेशनपर्यंत पुर्ववत सुरु करण्यात यावी अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीचे गटनेते अनिल वानखेडे,तालुका भाजप प्रवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष गोविंद मराठे, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, उल्हास देशमुख, प्रकाश देसले, माजी पं.स. सदस्य सुभाष माळी, प्रकाश चौधरी,माजी नगरसेवक राहुल महिरे, मनोहर पाटील,ॲड.विनोद पाटील, राजेंद्र मराठे, देविदास माळी,किसन सकट उपस्थित होते.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे शासकीय कामानिमित्त जळगाव येथून सुरतला रेल्वेला जाणार असल्याचे शिंदखेडा येथील भाजपच्या कार्यकर्त्यांना माहित झाले. रेल्वे राज्यमंत्री या मार्गाने जात असल्याने अति जलद रेल्वें गाड्यांना थांबा मिळावा यासाठी निवेदन देण्याच्या निमित्ताने राज्यमंत्री श्री दानवे यांची भेट या कार्यकर्त्यांनी घेतली. श्री.दानवे ज्या गाडीने प्रवास करीत होते ती रेल्वे या मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकावर थांबविण्याची विनंती त्या त्या गावातल्या कार्यकर्त्यांनी केली त्याप्रमाणे शिंदखेडा रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबविण्यात यावी यासाठी प्रयत्न केले गेले. दोन वेळा गाडी थांबविण्यात येणार नसल्याचा निरोप कार्यकर्त्यांना मिळाला परंतु अखेर काल शनिवारी दुपारी १२.३० ला रेल्वे शिंदखेडा जे रेल्वे स्थानकावर थांबल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आनंदाला जणू उधाणच आले. प्रत्यक्ष केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री दानवे यांची भेट घेतल्याचा आनंद कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.