काश्मीरमध्ये स्कूल बसवर दगडफेक; विद्यार्थी जखमी

0

श्रीनगर । हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगरचा भारतीय जवानांनी खात्मा केल्यानतंर काश्मीर खोर्‍यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर काश्मीर खोर्‍यात पुन्हा एकदा दगडफेकीला सुरुवात झाली असून दगडफेक करणार्‍यांनी आता शाळेतील विद्यार्थ्यांना टार्गेट केले आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. बुधवारी कानीपोरा येथे दगडफेक करणार्‍यांनी शाळेच्या बसवरच दगडफेक केली.

या बसमध्ये 4-5 विद्यार्थी होते. या दगडफेकीत त्यापैकी एका विद्यार्थ्याचे डोके फुटले आहे. जखमी विद्यार्थ्याच्या पालकाने या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. विद्यार्ध्यांच्या बसवरील दगडफेक हा प्रकार मानवतेच्या विरोधात आहे,’ असा संताप या विद्यार्थ्याच्या पालकाने व्यक्त केला. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

लहान मुलं आणि पर्यटकांवर दगडफेक करून या लोकांचा अजेंडा कसा पूर्ण होईल? अशा प्रकारच्या हल्ल्यांचा सर्वांनी मिळून एका सुरात निषेध नोंदविला पाहिजे,’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. ‘समाजकंटकांनी रेनबो स्कूल शोपियांच्या बसवर दगडफेक केली. या बसमध्ये इयत्ता दुसरीचे विद्यार्थी होते. त्यातील रेहान नावाचा विद्यार्थी जखमी झाला आहे.

विद्यार्थ्यांना लक्ष्य करणं हा शुद्ध वेडेपणा आहे. या हल्लेखोरांना कायद्याच्या कारवाईला सामोरे जावेच लागेल,’ असं ट्विट जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी केलं. दरम्यान, मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनीही या घटनेचा निषेध नोंदविला आहे. ’ही घटना कळल्यानंतर मी स्तब्ध झाले आणि या घटनेचा प्रचंड राग आला. हा भ्याड हल्ला असून हल्लेखोरांना सोडणार नाही,’ असं महबूबा यांनी सांगितले.